तिरुअनंतपुरम- राष्ट्रवादीत अजित पवार यांचे बंड झाल्यानंतर राज्याबाहेरही राष्ट्रवादीसमोरील अडचणी वाढल्या आहेत. केरळ राष्ट्रवादीतील गटबाजी समोर येत आहे. राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेते व आमदार थॉमस के. थॉमस यांना आपल्याच पक्षांच्या नेत्यांवर व केरळ सरकारवर हत्येचा कट रचल्याचा आरोप केला. या आरोपामुळे शिस्तभंग होत असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी थॉमस यांना पत्र लिहून कार्यकारिणीतून काढल्याचे कळविले आहे.
शरद पवार यांनी आमदार थॉमस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, तुमच्याकडून होत असलेल्या गंभीर बेशिस्त वर्तनामुळे पक्षाचे अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षांच्या अधिकाराचा खुलेआम अवमान होत आहे. आपण पक्षाच्या सदस्यांवर बेजबाबदार आरोप करत आहात. तुमच्या पक्षाच्या पदाचा वापर करून खोट्या तक्रारी दाखल करत आहात. त्यामधून पक्षाची जनमानसातील प्रतिमा बदनाम होत आहे. मी तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीतून काढून टाकतो, असे पवार यांनी पत्रात म्हटले आहे.
काय केले आहेत थॉमस यांचे आरोप-आमदार थॉमस के थॉमस हे कुट्टनाड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही जिल्हा नेत्यांविरुद्ध राज्य पोलीस प्रमुखांकडे तक्रार दाखल केली. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जीवन संपविण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांनी आरोप केला. थॉमस यांनी केरळ सरकारवरही आरोप केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी कार्यकारिणी सदस्य रेजी चेरियान यांनी हत्या करण्याचा कट रचल्याचा अहवाल थॉमस यांनी राज्य पोलीस प्रमुखांना दिला आहे. थॉमसने यांनी अहवालात दावा केला की त्यांच्या ड्रायव्हरला खुनाच्या कटासाठी लाच देण्यात आली आहे. आपले जीवन संपवण्याचा हा डाव रचला जात असल्याची केरळमधील नेतृत्वाला माहिती आहे, असा त्यांनी दावा केला.