दिल्ली -नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. यावेळी सध्या सुरु असलेल्या सत्तासंघर्षांत विजय सत्याचा की प्रलोभनाचा होईल, असा सवाल प्रसारमाध्यमांनी पवार यांना केला होता. त्यावर विजय उद्धव ठाकरेंचा होईल. चाळीस ते पन्नास आमदारांच्या बंडखोरींनी शिवसेनेवर परिणाम होणार नाही, असे शरद पवारांनी म्हटलं ( Sharad Pawar On Maharashtra Political Crisis ) आहे.
"आमचा महाविकास आघाडीला पाठींबा" - शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रातील परिस्थिती कशी सुधरता येईल, याचा निर्णय आम्हाला तेथेच घ्यायचा आहे. आसाममध्ये गेलेल्या शिवसेनेच्या काही आमदारांची वक्तव्य समोर आली आहेत. त्यातून स्पष्ट होते आहे की त्यांना सत्तापरिवर्तन हवं आहे. शिवसेनेला खात्री आहे त्यांची लोक परत येतील आणि त्यांच्या भूमिकेत बदल होईल. आमचा महाविकास आघाडीला पाठींबा आहे.
"राष्ट्रपती राजवट लागू झाली तर..." - एकनाथ शिंदे सोबत गेलेल्या आमदारांनी नवा गट स्थापन करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार टिकवण्यासाठी आम्ही शिवसेनेला पाठींबा देऊ. तसेच, राज्यात राष्ट्रपती राजवट लागल्यास बंडखोर शिवसेना आमदारांच्या मेहनतीवर पाणी फिरेल. राष्ट्रपती राजवट लागली तर पुन्हा निवडणुका होतील, असे पवारांनी स्पष्ट केलं आहे.