नवी दिल्ली - बिहारमध्ये नितिश कुमार यांनी नुकता मोठा राजकीय खेळ केला. एका दिवसात बाजू पलटत एनडीएतून युपीएत दाखल होत आपले महत्व आणि राजकीय वजन कायम ठेवले आहे. त्यानंतर राज्यासह देशभरात विरोधी पक्षांत नवा उत्साह पाहायला मिळत आहे. ( Sharad Pawar and Nitish Kumar will meet ) त्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची आणि नितीश कुमार यांची भेट झाली. आता नितिश कुमार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची 8 सप्टेंबरला भेट घेणार आहेत. ही भेट होणार असल्याची बातमी आल्यानंतर तत्काळ देशभरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
नितीश कुमार आणि शरद पवार यांची भेट येत्या ( ८ सप्टेंबर )रोजी दिल्लीमध्ये होणार आहे. पवार यांच्या निवासस्थानी ही भेट होणार आहे. आगामी निवडणुकीत विरोधी पक्षांची रणनीती काय असावी, यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नीतीश कुमार हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून ( NDA ) बाहेर पडले आहेत. त्यांनी भाजपसोबत काडीमोड घेत लालूप्रसाद यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी युती करत बिहारमध्ये सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे भाजपच्या विरोधात लढण्यासाठी या बैठकीत काय रणनीती ठरते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.