शहाजहापूर- भारतातून दरवर्षी हजारो नागरिक परदेशात नोकरीसाठी जातात. यातील काहींना मनासारखी नोकरी मिळते तर काहींची फसवणुकही होते. उत्तर प्रदेशातील एका युवकाची अशीच मित्राने फसवणूक केल्याने इराणच्या रस्त्यांवर फिरण्याची वेळ आली. मात्र, सुदैवाने परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने या युवकाला भारतात परत आणण्यात आले आहे.
बळजबरीने जुंपले कामावर -
उत्तर प्रदेशातील शहाजहापूर येथील रिंकू नामक तरुणाला त्याच्या मित्राने इराणमध्ये नोकरीला लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार तो इराणमध्ये गेला. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लवकरच त्याच्या लक्षात आले. तो ज्या कंपनीच्या जहाजावर काम करत होता, त्याला त्यांनी बळजबरीने कामाव जुंपले होते. त्यामुळे माघारी भारतात येण्याचे त्याचे सर्व रस्ते बंद झाले होते. मात्र, त्याला या जहाजावरून सुटका करून घेण्यात यश आले. त्यानंतर अनेक दिवस तो इराणच्या रस्त्यांवर बेवारससारखा फिरत होता.
रिंकू भारतात पोहचल्यावर त्याचे पेढा भरवून स्वागत करण्यात आले शेवटी भारतातील कुटुंबीयांशी त्याने कशीबशी मदत मिळवत संपर्क साधून फसवणुकीची कहानी सांगितली. त्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ शहाजहापूरचे खासदार अरूण सागर आणि आमदाराशी संपर्क साधून मदतीची विनंती केली. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी संपर्क साधून रिंकूची भारतात येण्याची व्यवस्था करण्यात आली. दरम्यानच्या काळात तो परराष्ट्र मंत्रालय आणि लोकप्रतिनिधींच्या सतत संपर्कात होता.
मित्राने केली फसवणूक
भारतात असताना रिंकूची एका व्यक्तीशी ओळख झाली होती. काही काळाने त्यांची चांगली मैत्री झाली. या व्यक्तीने रिंकूला परदेशात व्यापारी जहाजावर काम लावून देण्याचे खोटे आश्वासन दिले. त्यासाठी साडेतीन लाखही घेतले.
१५ डिसेंबर २०२० ला रिंकू मुंबईतील बेलापूर येथे मित्रासोबत पोहचला. त्यांच्यासोबत एक एजंटही होता. त्याने रिंकूची भारतातून इराणमध्ये जाण्याची व्यवस्था केली. मात्र, नोकरीचा किंवा किती काळ राहायचे याचा कोणताही करार केला नाही. रिंकू इराणमधील बुशेर शहरात पोहचल्यानंतर त्याला दुसऱ्याच एका जहाजावर कामासाठी नेण्यात आले. तेव्हा त्याला आपली फसवणूक झाल्याचे समजले.