नवी दिल्ली Shahnawaz Hussain : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि बिहार विधान परिषदेचे सदस्य शाहनवाज हुसैन यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टानं त्यांना बुधवारी (११ ऑक्टोबर) समन्स बजावला. न्यायालयानं त्यांना २० ऑक्टोबरला हजर राहण्याचा आदेश दिला आहे. शाहनवाज हुसैन यांच्यावर बलात्कार आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
न्यायालय काय म्हणालं : न्यायमूर्ती म्हणाले की, एफआयआर रद्द करण्याचा अहवाल, तक्रारदारानं दाखल केलेली निषेध याचिका, तपास अधिकाऱ्यानं निषेध याचिकेवर दाखल केलेला जबाब आणि रेकॉर्डवर ठेवलेल्या इतर गोष्टी विचारात घेऊन न्यायालयानं हा निर्णय घेतला. न्यायालयानं म्हटलं की, तक्रारदारानं फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) च्या कलम १६४ अंतर्गत पोलीस आणि दंडाधिकार्यांसमोर समान विधानं दिली. पोलिसांनी न्यायालयात अहवाल दाखल करून एफआयआर रद्द करण्याची विनंती केली होती. कोर्टाने पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट फेटाळला.
काय आहे प्रकरण :२०१७ मध्ये दिल्लीतील रहिवासी एका महिलेनं शाहनवाज हुसैन यांच्याविरोधात बलात्कार आणि धमकी दिल्याची तक्रार दाखल केली होती. महिलेनं शाहनवाज हुसैन यांचा भाऊ शाहबाज हुसैन यांच्यावरही लग्नाच्या बहाण्यानं बलात्कार केल्याचा आरोप केला होता. ३१ मे २०२२ रोजी न्यायालयानं हा दखलपात्र गुन्हा मानून दिल्ली पोलिसांना शाहनवाज हुसैन आणि शाहबाज हुसैन यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले होते.
उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचा धक्का : यानंतर शाहनवाज हुसैन यांनी या तक्रारीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र उच्च न्यायालयानं हुसैन यांची याचिका फेटाळून लावत एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले. या आदेशाविरोधात हुसैन यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडूनही दिलासा मिळाला नाही. यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवला. तपासानंतर पोलिसांनी शाहनवाज हुसैन यांना क्लीन चिट दिली आणि या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केला. तो रिपोर्ट आज न्यायालयानं फेटाळला.
हेही वाचा :
- MP Assembly Election : भाजपानं चौथी यादी जाहीर केली, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह कोण आहेत दिग्गज उमेदवार