हर्णी तलावात बेपत्ता मुलांचा शोध घेताना पथक गांधीनगर Vadodara Boat Accident : गुजरातमधील वडोदरा येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. हर्णी तलावात बोट उलटल्यानं 15 मुलं बुडाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एका शिक्षकाचाही मृत्यू झालाय. या बोटीत 27 विद्यार्थी होते. हे सर्व विद्यार्थी पिकनिकसाठी गुजरातला आले होते. घटनेनंतर मुलांचा आरडाओरडा ऐकून लोकांनी प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर परिसरात रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं.
चार ते पाच जण अद्याप बेपत्ता : मिळालेल्या माहितीनुसार, या बोटीत 23 विद्यार्थ्यांसह चार शिक्षक होते. ही बोट बुडाल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासनानं लगेच रेस्क्यू ऑपरेशन राबवलं. यातून आठ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. चार ते पाच जण अद्यापही बेपत्ता आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. बोटीची क्षमता 14 लोकांची होती, परंतु, 27 हून अधिक लोक बोटीमध्ये बसल्यानं बोट बुडाल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
10 हून अधिक रुग्णवाहिका घटनास्थळी : सर्व विद्यार्थी वडोदरा येथील एका शाळेतील होते. घटनेनंतर लगेच बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. 10 हून अधिक रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं होतं.
पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याकडून दु:ख व्यक्त : वडोदरा येथील बोट दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दु:ख व्यक्त केलंय. वडोदरा येथील हर्णी तलावात बोट उलटल्यानं झालेल्या दुर्घटनेमुळं व्यथित आहे, असं म्हणत मोदींनी प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना PMNRF फंडातून 2 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
अपघातग्रस्तांना तातडीनं मदत : गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी 'एक्स'वर पोस्ट करून दु:ख व्यक्त केलं आहे. हर्णी तलाव दुर्घटनेनंतर मदत- बचाव काम सुरू आहे. राज्य सरकारनं प्रत्येक मृतांच्या कुटुंबियांना 4 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल म्हणाले, 'वडोदराच्या हर्णी तलावात बुडालेल्या मुलांची बातमी अतिशय दु:खद आहे. ज्या मुलांनी जीव गमावला, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी, यासाठी मी प्रार्थना करतो. या घटनेमुळं मला दु:ख झालं आहे. मी विद्यार्थांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे. विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देव देवो. अपघातग्रस्तांना तातडीनं मदत, उपचार देण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.'
हेही वाचा -
- राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी देशात अर्धा दिवस सुट्टी, केंद्र सरकारचा आदेश जारी
- ओडिशातून महाराष्ट्रात ड्रग्जची तस्करी, साडेअकरा लाखाचा 46 किलो गांजा सिकंदराबादमध्ये जप्त
- महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद; महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांनी कर्नाटकात येऊ नये, सिद्धरामय्यांनी ठणकावलं