डेहराडून - उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील रविवारी रात्री निरकोट आणि कांकरणी भागात ढगफुटी झाली आहे. यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. एसडीआरएफकडून मदत व बचावकार्य सुरू असून बेपत्ता लोकांचा शोध घेण्यात येत आहे. दोन ठिकाणी ढगफुटीमुळे जीवितहानी झाली.
मांडो गावातील 4 ते 5 घरे जमीनदोस्त झाली आहेत. यात देवानन्द भट्ट यांच्या कुटुंबातील दोन महिला आणि एका मुलीचा मृतदेह रेस्क्यू टीमने ताब्यात घेतले आहे. तर 4 जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. सलग पाऊस सुरूच असल्याने बचावकार्यात अ़डचण निर्माण होत आहे. तसेच उत्तरकाशी जिल्ह्यातील कालेश्वर मार्गावरील घरांमध्ये पाणी भरलं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी टि्वट करून पीडित कुटुंबाप्रती सहवेदना व्यक्त केल्या. प्राथमिकतेने मदत आणि बचावकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.