मुंबई -प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा ( Announcement of Padma Awards ) झाली असून त्यात महाराष्ट्रातील 10 व्यक्तींना गौरवण्यात आले आहे. त्यामध्ये ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण ( Senior singer Sulochana Chavan ) यांना कला क्षेत्रातील योगदानाबाबत पद्मश्री पुरस्काराने ( Padma Shri Award 2022 ) गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कारामुळे महाराष्ट्राची मान उंचावली आहे.
- कोण आहेत सुलोचना चव्हाण?
सुलोचना चव्हाण यांचा जन्म मुंबईत 17 मार्च 1933 साली झाला. त्या एक प्रसिद्ध मराठी गायिका आहेत. त्यांचे माहेरचे आडनाव कदम असे आहेत. मुंबईतील एका चाळीत त्यांचे बालपण गेले. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच त्यांनी गायनाला सुरुवात केली. सुलोचना चव्हाण यांच्या घरचाच एक मेळा होता श्रीकृष्ण बाळमेळा. याच मेळ्यात त्यांच्यासोबत अभिनेत्री संध्या यांनी सुद्धा काम केले होते. या श्रीकृष्ण बाळमेळ्याच्या माध्यमातून सुलोचना चव्हाण यांचे कलाक्षेत्रात पहिले पाऊल पडले. मेळ्यांच्या सोबतीत त्यांनी हिंदी, गुजराती आणि उर्दू नाटकात बालभूमिका केलेल्या आहेत. त्यांची मोठी बहीण स्वतः कला क्षेत्रात नव्हती. परंतु सुलोचना चव्हाणांना नेहमी प्रोत्साहन देत असे. सुलोचनाने उत्तम गावे असे त्यांना वाटत असे. असे असले तरी, सुलोचना चव्हाण यांना गायनाचे कोणतेही शास्त्रीय शिक्षण मिळाले नाही. त्याकाळात ग्रामोफोन रेकॉर्ड ऐकून ऐकूनच त्या गायनाचा रियाज करत असे. त्याकाळात परिस्थितीशी झगडून त्यांनी गाण्याची कला आत्मसात केली आणि त्यामुळेच त्यांची ही कला चिरकालीन टिकावी अशीच निर्माण केली आहे.
- 'या' भाषांमध्ये केले गायन
श्रीकृष्ण बाळमेळ्यामध्येच मेकअपमन दांडेकर हे चित्रपटसृष्टीशी संबंधित होते. त्यांच्यामुळेच संगीत दिग्दर्शक श्याम बाबू भट्टाचार्य पाठक यांच्याकडे सुलोचना चव्हाण यांनी पहिले गाणे गायले. तो चित्रपट हिंदी भाषेतील होता आणि चित्रपटाचे नाव होते 'कृष्ण सुदामा'. पहिले गाणे जेंव्हा सुलोचना चव्हाण गायल्या तेंव्हा त्यांचे वय होते अवघे नऊ वर्षे. आपण गाणे रेकॉर्डिंगसाठी फ्रॉकमध्ये गेलो होतो, अशी आठवण देखील त्या आवर्जून सांगतात. पार्श्वगायन करताना मोहम्मद रफी, मन्ना डे, शमशाद बेगम, गीता दत्त, श्यामसुंदर यांच्यासारख्या आघाडीच्या गायकांबरोबर गाण्याची संधी त्यांना मिळाली. करियरच्या सुरुवातीलाच अनेक दिग्गजांबरोबर त्यांनी काम केले आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी गायक मन्ना डे यांच्यासोबत त्या 'भोजपुरी रामायण' गायल्या होत्या. मराठी व्यतिरिक्त त्यांनी हिंदी, गुजराती, भोजपुरी, तामीळ, पंजाबी या भाषांमध्ये त्यांनी भजन, गझल असे विविध प्रकारदेखील हाताळले आहेत.
- अशी मिळाली लावणीसम्राज्ञी म्हणून ओळख
वत्सलाबाई कुमठेकर यांनी गायलेली 'सांभाळ गं, सांभाळ गं, सांभाळ दौलत लाखाची' ही लावणी सुलोचना चव्हाण लहानपणी वारंवार गुणगुणत असत आणि त्यासाठी आईकडून त्यांनी भरपूर ओरडाही खाल्ला होता. कारण मुलींनी लावणी ऐकू नये, गाऊ नये असे त्यांच्या आईला वाटायचे. पुढे मराठी लावणीसम्राज्ञी ठरलेल्या सुलोचना चव्हाण यांनी पहिली लावणी, आचार्य अत्रे यांच्या 'हीच माझी लक्ष्मी' या चित्रपटात गायली. याचे संगीतकार होते वसंत देसाई, आणि ही लावणी हंसा वाडकर यांच्यावर चित्रित झाली होती. या एका गाण्याने सुलोचना चव्हाणांच्या कारकिर्दीला लावणीच्या दिशेने वळण लागले. त्या लावणीचे शब्द होते 'मुंबईच्या कालेजात गेले पती, आले होऊनशान बीए बीटी...'. यानंतरच आचार्य अत्रे यांनीच त्यांना 'लावणीसम्राज्ञी' असा किताब दिला.
- सुलोचना चव्हाण यांच्या काही प्रसिद्ध लावण्या
१. नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापुरची, मला हो म्हणत्यात लवंगी मिरची
२. तरुणपणाच्या रस्त्यावरच पहिलं ठिकाणं नाक्याचं, सोळावं वरीस धोक्याचं
३. पाडाला पिकलाय आंबा
४. फड सांभाळ तुर्याला गं आला, तुझ्या उसाला लागंल कोल्हा
५. कळीदार कपूरी पान, कोवळं छान, केशरी चुना रंगला काथ केवडा वर्खाचा विडा घ्या हो मनरमणा
६. खेळताना रंग बाई होळीचा होळीचा, फाटला गं कोना माझ्या चोळीचा
७. कसं काय पाटील बरं हाय का, काल काय ऐकलं ते खरं हाय का?
८. स्वर्गाहुन प्रिय आम्हाला आमचा सुंदर भारत देश, आम्ही जरी एक जरीही नाना जाती नाना वेष