मिर्जापूर(उत्तर प्रदेश) - राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशनच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेले वॉल हँगिंग आणि पायपुसणी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप सोडण्यासाठी तयार आहे. जपानमध्ये २०२१मध्ये भरणाऱ्या गालिचे मेळ्यात मिर्झापूर येथील पायपुसणी आणि वॉल हॅंगिंगचे प्रदर्शन भरणार आहे. बचत गटातील महिलांनी तयार केलेले वॉल हँगिंग आणि पायपुसणी जपानी लोकांना आकर्षित करत आहे. त्यामुळे विदेशात लागणाऱ्या हस्तनिर्मित गालिचा मेळ्यात मिर्जापूरच्या वस्तू दिसतील. या बचत गटातील महिलांनादेखील जपानमधून ऑर्डर्स मिळण्याची अपेक्षा आहे.
खजुरी येथील बचत गटातील महिलांनी बनवलेल्या वस्तूंची निवड जपानमधील मेळ्यासाठी करण्यात आली आहे. जपानच्या या मेळ्यात बचत गटाला आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांनी गालिच्यातून तयार केलेल्या वॉल हँगिंग आणि पायपुसणी या मेळ्यात दिसतील. भदोही आणि मिर्झापूर येथील गालिचे देश-विदेशात प्रसिद्ध आहेत. चांगल्या डिझाईनमुळे या गालिच्यांना खूप मागणी असते.
अनेक राज्यात भरवली गेली प्रदर्शने -
येथील महिला गालिच्यापासून वॉल हँगिंग आणि पायपुसणी तयार करतात. या वस्तूंची देशातील अनेक शहरांमध्ये मागणी केली जाते. येथील बचत गटातील महिलांनी आतापर्यंत मेघालय, केरळ, रायपूर, हैदराबाद, दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि लखनऊमध्ये या वस्तूंची विक्री केली आहे. एका मेळ्यात ८० ते ९० हजार रुपयांच्या वस्तूंची विक्री होती. त्यात त्यांना ३० हजारांपर्यंत लाभ होतो. तसेच या महिला स्थानिक बाजारांमध्येही या वस्तूंची विक्री करतात.