नवी दिल्ली/ग्रेटर नोएडा :पाकिस्तानातील कराचीमधून भारतात आलेली सीमा हैदर आणि तिचा भारतीय प्रियकर सचिन मीना यांच्या प्रेमकथेवर आधारित एक चित्रपट येतोय. त्याचं शीर्षक, 'कराची टू नोएडा' असं प्रस्तावित होतं. यासाठी नोएडामध्ये कलाकारांच्या ऑडिशन्स घेण्यात आल्या. त्यानंतर दिल्लीत त्यांचे एक 'चल पडे है हम' हे गाणेही लाँच करण्यात आलं. मात्र आता चित्रपटाच्या शीर्षकाची मुंबईत येऊन नोंदणी करण्यापासून इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशनने (IMPPA) चित्रपटाच्या निर्मात्याला रोखलं आहे.
चित्रपटासाठी सीमाची ऑडिशन घेण्यात आली : जानी फायरफॉक्स चित्रपटाचे निर्माते अमित जानी यांनी सीमा हैदर आणि सचिन मीना यांच्या प्रेमकथेवर आधारित चित्रपटाची घोषणा केलीय. या चित्रपटात काम करण्यासाठी त्यांनी सीमाला ऑफर दिली होती. यासाठी तिची ऑडिशनही घेण्यात आली. मात्र सीमा आपल्या चार मुलांसह बेकायदेशीरपणे भारतात आली असल्याने सध्या स्थानिक पोलीस, यूपी एटीएस आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणांकडून तिची चौकशी सुरू आहे. चित्रपटाची ऑफर मिळाल्यानंतर सीमा हैदर म्हणाली होती की, पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा एजन्सीकडून क्लीन चीट मिळाल्यावर मी चित्रपटात काम करेन. मात्र, आता असोसिएशनने या चित्रपटाचं शीर्षक मुंबईत ऑफलाइन रजिस्टर करण्यास स्पष्ट नकार दिलाय.
'मनसे'च्या दबावाखाली हा निर्णय घेतला : 'इम्पा' ने चित्रपटाचं शीर्षक नोंदवण्यास नकार दिल्यानंतर अमित जानी यांनी याप्रकरणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. जानी यांच्या दाव्यानुसार, 'इम्पा'चे सचिव अनिल नागरथ यांनी त्यांना फोन करून मुंबई कार्यालयात येण्यास मनाई केली. जर तुम्ही कार्यालयात आलात तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आमचं कार्यालय फोडेल. तुमच्या चित्रपटाच्या शीर्षकाची ऑनलाइन नोंदणी होतेय, असं नागरथ यांनी आपल्याला सांगितल्याची माहिती अमित जानी यांनी दिलीय.