आजपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन; 6 अध्यादेश आणि 10 विधेयके मांडण्यात येणार
विधीमंडळाच्या आजपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात 6 अध्यादेश आणि 10 विधेयके मांडण्यात येणार आहेत. गेल्या वर्षभरात मंत्रिमंडळाच्या बैठकीत 200 निर्णय घेण्यात आले असून त्यातील आठ महिने कोरोनाशी झुंज देण्यात गेली आहेत. कोरोना आणि बेमोसमी पाऊस या संकटांशी सामना करीत सरकार मार्गक्रमण करीत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
हिंगणघाट जळीतकांड खटल्याच्या सुनावणीला आजपासून सुरुवात; अॅड. उज्ज्वल निकम करणार युक्तिवाद
राज्यात गाजलेल्या हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाच्या सुनावणीला आजपासून (सोमवार) न्यायालयात सुरुवात होणार आहे. या खटल्यासाठी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार उज्ज्वल निकम सोमवारी हिंगणघाट न्यायालयात युक्तिवाद करण्यासाठी हजर होतील.
मराठा क्रांती मोर्चाकडून कोल्हापूर ते मुंबईपर्यंत रॅलीचे आयोजन; आज होईल सुरुवात
आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाज पुन्हा एकदा राज्य सरकारला घेरणार आहे. त्यासाठी कोल्हापूर मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मराठा क्रांती मोर्चाकडून कोल्हापूर ते मुंबईपर्यंत रॅलीचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज (सोमवार) या रॅलीला सुरुवात होईल. कोल्हापूर ते मुंबईपर्यंत ही रॅली काढण्यात येणार आहे.
शाळांतील शिपाई पदे रद्द करण्यास संघटनांचा विरोध ; आज राज्यभर आंदोलन
राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अंशतः/ पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी आकृतीबंध लागू करण्याबाबतच्या महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचा निर्णय हा पूर्णतः अन्यायकारक आहे. शासनानेच नेमलेल्या आकृतिबंध समितीने सुचवलेल्या सूचनांच्या पूर्णपणे विरोधात हा शासन निर्णय आहे. त्यामुळेच शासनाच्या या निर्णयाचा महाराष्ट्रातील सर्वच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी जाहीर निषेध करत आहेत.