भटिंडा - पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या सुरक्षा व्यवस्थेत अक्षम्य ढिलाई झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या गंभीर सुरक्षा त्रुटीची दखल घेत गृह मंत्रालयाने (MHA) पंजाब सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला असून राज्य सरकारलाही या चुकांची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. बुधवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भटिंडा येथे दाखल झाले. तेथून ते हेलिकॉप्टरने हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारक (National Marytrs Memorial Hussainiwala) येथे जाणार होते. पाऊस आणि खराब दृश्यमानतेमुळे पंतप्रधानांनी हवामान स्वच्छ होण्याची सुमारे 20 मिनिटे वाट पाहिली.
दरम्यान, ANI वृत्तसंस्थेने केलेल्या ट्विटनुसार भटिंडा विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की मोदी परत आल्यानंतर अधिकाऱ्यांना म्हणाले, की मी भटिंडा विमानतळावर जिवंत परत आलो, हे तुमच्या मुख्यमंत्र्यांना सांगा. यासाठी त्यांना धन्यवाद द्या.
वाट पाहूनही जेव्हा हवामानात सुधारणा होत नव्हती, तेव्हा पंतप्रधानांनी रस्त्याने राष्ट्रीय मेरीटर्स मेमोरियलला भेट देण्याचे ठरवले. रस्त्याने जाण्यासाठी त्यांना दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागला. पंजाब पोलीस डीजीपीकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्थेची पुष्टी केल्यानंतर पंतप्रधानांचा (Prime Minister Narendra Modi's convoy) ताफा रस्त्याने प्रवास करण्यास निघाला.