दावणगेरे (कर्नाटक) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावणगेरे येथे शनिवारी रोड शो आयोजित केला होता. यावेळी त्यांच्या ताफ्यात एक व्यक्ती जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, पोलिसांनी त्याला अडवले व ताब्यात घेतले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत कर्नाटकातील ही दुसरी मोठी चूक आहे. याआधी हुबळी येथे एका तुरुणाने मोदींना जबरदस्तीने हार घालण्याचा प्रयत्न केला होता.
मोदींच्या सुरक्षेत चूक - सुरक्षेत चूक झाल्याचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. यामध्ये अतिउत्साही एक व्यक्ती पक्षाने जारी केलेला पास परिधान करून पंतप्रधानांच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी कर्नाटक पोलिसांनी त्या व्यक्तीला ताबडतोब रोखले आहे. ही व्यक्ती कोप्पल येथील पक्षाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे.
कर्नाटक दौरा - पंतप्रधान मोदी शनिवारी (25 मार्च) एक दिवसाच्या कर्नाटक दौऱ्यावर आले होते. सकाळी 10.45 च्या सुमारास, पंतप्रधानांनी चिक्कबल्लापूर येथे श्री मधुसूदन साई इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च (SMSIMSR) चे उद्घाटन केले. त्यानंतर दुपारी 1 च्या सुमारास मोदींनी बंगळुरू मेट्रोच्या व्हाईटफील्ड (कडुगोडी) ते कृष्णराजपुरा मेट्रो लाइनचेही उद्घाटन केले. यावेळी त्यांनी मेट्रोची राइड देखील केली.
कर्नाटकातील दुसरी घटना -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 12 जानेवारी रोजील कर्नाटकातील हुबळी येथे रोड शो होता. मात्र, या रोड शो दरम्यान त्यांच्या सुरक्षेत गलथानपणाचा प्रकार समोर आला होता. यावेळी एका तरुणाने बॅरिगेट्स ओलांडून मोदींना हार घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी लगेच त्या तरुणाकडून हार हिसकावून घेत त्याला ताब्यात घेतले होते.