मुंबई :पहिल्या भारत जोडो यात्रेच्या प्रचंड यशानंतर आता राहुल गांधींच्या दुसऱ्या भारत जोडो यात्रेबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. सप्टेंबर महिन्यात त्यांची ही यात्रा सुरू होणार असल्याची चर्चा आहे. यात्रेच्या तारखांबाबत आणि मार्गाबाबत कॉंग्रेस पक्षातर्फे अद्याप अधिकृतरित्या काही जाहीर करण्यात आले नसले तरी महाराष्ट्र कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी यात्रेच्या मार्गाचा खुलासा केला आहे.
नाना पटोले यांनी सांगितला यात्रेचा मार्ग : पहिली भारत जोडो यात्रा कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत दक्षिण-उत्तर अशी झाली होती. त्यामुळे आता यात्रेचा दुसरा टप्पा पश्चिम-पूर्व असा असेल, अशी चर्चा आहे. नाना पटोले यांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. 'राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा गुजरात ते मेघालय असा असेल', असे नाना पटोले यांनी सांगितले. याचाच अर्थ दुसरी भारत जोडो यात्रा पश्चिम भारतात सुरू होऊन पूर्व भारताचे टोक गाठणार आहे.
तारखांबाबत मंथन चालू : भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची तारीख मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. कॉंग्रेस पक्षात यावर मंथन चालू आहे. १५ ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्यदिनी यात्रा सुरू करण्यात यावी, असे पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र यावर अंतिम निर्णय भारत जोडो यात्रा समन्वय समितीच घेईल. पहिली भारत जोडो यात्रा ७ सप्टेंबर २०२२ रोजी तामिळनाडूमधील कन्याकुमारी येथून सुरू झाली होती. ३० जानेवारी २०२३ रोजी श्रीनगरमध्ये तिची सांगता झाली.
आगामी निवडणुकांवर कॉंग्रेसचा डोळा : कॉंग्रेस पक्षाला आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुका आणि या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी भारत जोडो यात्रेचा उपयोग करून घ्यायचा आहे. पहिल्या टप्यात ही यात्रा कर्नाटकातून गेली होती. जेथे नंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळाले होते. या यशामध्ये भारत जोडो यात्रेचा मोठा वाटा होता. त्यामुळे आता कॉंग्रेस पक्षाला हा प्रयोग देशातील अन्य राज्यांमध्ये देखील करायचा आहे.
हेही वाचा :
- Raj Thackeray Taunt BJP : कर्नाटक निवडणुकीत 'भारत जोडो' यात्रेचा परिणाम; राज ठाकरेंचा भाजपला टोला
- Bharat Jodo Yatra : राहुल गांधींची दुसरी भारत जोडो यात्रा लवकरच, असा असेल मार्ग..