भुवनेश्वर (ओडिशा) : केरळमध्ये सध्या निपाह व्हायरसचा धोका वाढत आहे. नुकताच कोझिकोडमध्ये दोन जणांचा निपाहमुळे मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर सरकारनं राज्याच्या आरोग्य यंत्रेणाला अलर्ट मोडवर ठेवलं आहे. कोझिकोडमध्ये प्रशासनानं नागरिकांना मास्क लावण्याचा सल्ला दिला. त्या पाठोपाठ आता ओडिशामध्ये स्क्रब टायफस आजारानं डोकं वर काढलं आहे.
बारगढ जिल्ह्यात पाच जणांचा मृत्यू : केरळनंतर आता ओडिशामध्ये दुसऱ्या एका रोगाच्या प्रसारानं खळबळ उडाली आहे. ओडिशातील बारगढ जिल्ह्यात नुकतेच स्क्रब टायफस आणि लेप्टोस्पायरोसिसमुळे पाच जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी राज्यात या रोगाच्या वाढीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागानं सर्व प्रमुख जिल्हा वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य अधिकारी, कॅपिटल हॉस्पिटल भुवनेश्वरचे संचालक आणि आरजीए तसेच राउरकेलाचे संचालक यांना हे निर्देश दिले आहेत.
आरोग्य विभागानं निवेदन केलंजारी: गुरुवारी ओडिशाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागानं एक अधिकृत निवेदन जारी केलं. 'राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमधून स्क्रब टायफस आणि लेप्टोस्पायरोसिसची प्रकरणं नोंदवली जात आहेत. याचा वेळेवर प्रतिबंध आणि व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. त्याच्या निदानासाठी निरीक्षण प्रणाली मजबूत करावी', असं या निवेदनात म्हटलं आहे.