महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

SCO Meeting In Goa : एससीओच्या बैठकीला गोव्यात आजपासून सुरुवात, पाकिस्तानचे मंत्री बिलावल भुट्टो झाले सहभागी

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आजपासून गोव्यात एससीओची बैठक सुरू होत आहे. या बैठकीला पाकिस्तानचे मंत्री बिलावल भुट्टो हे सहभागी झाले आहेत.

SCO Meeting In Goa
पाकिस्तानचे मंत्री बिलावल भुट्टो यांचे संग्रहित छायाचित्र

By

Published : May 4, 2023, 9:34 AM IST

Updated : May 4, 2023, 2:34 PM IST

पणजी : गोव्यात आजपासून शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) ची दोन दिवसीय परराष्ट्र मंत्र्यांची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांच्यासह चीनचे परराष्ट्र मंत्री चिन कांग, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव आदींचा समावेश आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवत आहेत. युक्रेन युद्धाबाबत रशिया आणि पाश्चात्य देशांमध्ये तणाव आहे. त्यासह चीनच्या विस्तारवादी भूमीकेबाबतही चिंता व्यक्त होत असताना ही बैठक होत आहे. त्यामुळे दहशतवादांसह विविध मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.

बिलावल भुट्टो आणि एस जयशंकर यांच्यात चर्चेची शक्यता :तालिबानच्या राजवटीत अफगाणीस्तान हा देश दहशतवादाचे जन्मस्थान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीत अफगाणिस्तानातील परिस्थितीवरही चर्चा होऊ शकते. यासोबतच विविध देशात निर्माण होत असलेल्या सुरक्षा परिस्थितीवरही चर्चा होऊ शकते. मात्र, एससीओ परिषदेव्यतिरिक्त जयशंकर आणि बिलावल यांच्यात कोणतीही द्विपक्षीय बैठक होते का, याकडे विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. जयशंकर त्यांच्या चीन, रशियासह इतर काही सदस्य देशांच्या मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा करतील. बिनोलिम येथील बीच रिसॉर्टमध्ये गुरुवारी चीन आणि लावरोव यांच्यात द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता आहे. परंतु जयशंकर आणि भुट्टो यांच्यात भेटीची अद्याप कोणतीही माहिती सूत्रांनी दिली नाही.

एससीओमध्ये आहे या देशांचा समावेश :चीनचे परराष्ट्र मंत्री चिन कांग आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव आज सकाळी गोव्यात पोहोचले आहेत. तर बिलावल भुट्टो झरदारी दुपारनंतर पोहोचले आहेत. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या परराष्ट्र मंत्री परिषदेची (CFM) बैठक 4 ते 5 मे 2023 या दरम्यान गोव्यात होत आहे. SCO ची स्थापना 2001 मध्ये शांघायमध्ये झाली. SCO मध्ये चीन, भारत, कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया, पाकिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांचा समावेश आहे. या वर्षी भारत या परिषदेचे अध्यक्षपद भूषवत आहे. भारत आणि पाकिस्तान 2017 मध्ये चीन स्थित SCO चे स्थायी सदस्य झाले आहेत.

एससीओ संघटना नाटोला पर्याय :एससीओ संघटनेच्या देशांमध्ये भारत हा महत्त्वाचा देश म्हणून उदयास आला आहे. चीन आणि रशिया हे या संघटनेतील प्रमुख देश आहेत. नाटोचा पर्याय म्हणूनही एससीओ या संघटनेकडे पाहिले जाते. एससीओचा सदस्य असूनही भारत हा चार देशांच्या संघटनेच्या क्वाडचाही सदस्य आहे. भारताव्यतिरिक्त क्वाडमध्ये अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश आहे. रशिया आणि चीन यांनी क्वाडला जोरदार विरोध केला आहे. संघटनेतील सहकार्य वाढवण्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यासह व्यवसाय, गुंतवणूक, कनेक्टिव्हिटी यासारख्या विषयावरही या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.

लडाखमुळे चीनसोबत तणावग्रस्त संबंध :दहशतवादासह युक्रेन युद्धाच्या परिणामांवरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. पूर्व लडाख सीमेवरील तणावामुळे चीनसोबतचे संबंध तणावग्रस्त असताना भारत एससीओ शिखर परिषदेचे आयोजन करत आहे. या बैठकीत परराष्ट्र मंत्री सध्याच्या संकटाच्या पार्श्‍वभूमीवर या सीमावादावर चर्चा करण्याची शक्यता आहे.

परराष्ट्र मंत्री हिना रब्बानीनंतर बिलावल भुट्टो भारतभेटीवर :परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी हे भारतात होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) बैठकीत सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे. 2011 नंतर पाकिस्तानी नेत्यांची भारतात येण्याची ही पहिली उच्चस्तरीय भेट असणार आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार या 2011 मध्ये भारतात आल्या होत्या. भारत, रशिया, चीन आणि शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या इतर सदस्य देशांनी शुक्रवारी नवी दिल्ली येथे आयोजित बैठकीत प्रादेशिक सुरक्षा आव्हाने आणि संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली आहे.

हेही वाचा - Wrestlers Protest : जंतरमंतरवर पोलीस आणि कुस्तीपटूंमध्ये मध्यरात्री रंगला सामना, पोलिसांनी मारहाण केल्याचा कुस्तीपटूंचा आरोप

Last Updated : May 4, 2023, 2:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details