नवी दिल्ली -मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाने कमलनाथ यांना स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळले होते. आयोगाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. कमलनाथ यांनी वारंवार आचारसंहितेचा भंग केला असल्याचा ठपका निवडणूक आयोगाने ठेवला होता. मध्य प्रदेशात विधानसभेच्या २८ जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी कमलनाथ स्टार प्रचारक म्हणून निवडले गेले होते.
निवडणुकीचा प्रचार आता संपुष्टात आला आहे. उद्या मतदान होणार आहे. अशावेळी कमलनाथ यांची याचिका व्यर्थ आहे, असे मत सरन्यायाधीश एस.ए.बोबडे यांनी व्यक्त केले. ३० ऑक्टोबरला कमलनाथ यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई केली होती. कमलनाथ यांनी सातत्याने निवडणूक आयोगाच्या नियमावलीचे उल्लंघन केले आहे, असे कारण देत आयोगाने ही कारवाई केली आहे.