नवी दिल्ली : Shahi Idgah Masjid Dispute :सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेशातील मथुरा येथील शाही मशिदीच्या (वादग्रस्त परिसर) सर्वेक्षणाच्या आदेशाला स्थगिती दिलीय. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की, याचिका कायम ठेवण्याविरुद्ध उच्च न्यायालयाने मशिदीच्या बाजूच्या याचिकेवर सुनावणी करावी. परंतु, न्यायालय आयुक्तांच्या नियुक्तीवर अंतरिम स्थगिती असेल. सर्वेक्षणाशी संबंधित आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिले होते. तर, शाही ईदगाह समितीने मथुरा जिल्हा न्यायालयातून सर्व प्रकरणे उच्च न्यायालयात हस्तांतरित करण्यास विरोध केला आहे. या मुद्द्यावर पुढील सुनावणी आता 23 जानेवारी 2024 रोजी होणार आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय काय होता : अलाहाबाद उच्च न्यायालयाने 14 डिसेंबर 2023 रोजी मथुरेच्या श्री कृष्ण जन्मभूमी मंदिर प्रकरणी आपला निर्णय दिला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाने मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर आणि शाही इदगाह मशिदीच्या वादग्रस्त जागेवर सर्वेक्षण करण्यास मान्यता दिली होती. वादग्रस्त जमिनीचं सर्वेक्षण वकिलांच्या माध्यमातून करून घेण्याची मागणीही न्यायालयाने मान्य केली होती. आपल्या निर्णयात न्यायालयाने ज्ञानवापी वादाच्या धर्तीवर मथुरेतील वादग्रस्त जागेचे अधिवक्ता आयुक्तांमार्फत सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते.
उच्च न्यायालयात याचिका कोणी दाखल केली :ही याचिका भगवान श्री कृष्ण विराजमान आणि इतर सात जणांनी दाखल केली होती. हरिशंकर जैन, विष्णू शंकर जैन, प्रभा पांडे आणि देवकी नंदन यांच्यामार्फत दाखल केली होती. ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे, की त्या मशिदीच्या खाली भगवान कृष्णाचं जन्मस्थान आहे. तसंच, काही संकेत आहेत जे सांगतात की येथे मंदिर आहे. हिंदू बाजूचे वकील विष्णू शंकर जैन यांच्या म्हणण्यानुसार, उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की, हिंदू मंदिरांचे वैशिष्ट्य असलेल्या कमळाच्या आकाराचा स्तंभ आहे.