नवी दिल्ली -वैद्यकीय विद्यापीठांना अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण, वैद्यकीय पदव्युत्तरच्या अंतिम परीक्षा ढकलण्याची विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली लावली आहे. वैद्यकीय पदव्युत्तरचे विद्यार्थी कोरोनाच्या काळात कर्तव्य बजावित असल्याच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा पुढे ढकलण्याची याचिका दाखल करण्यात आली होती.
वैद्यकीय पदव्युत्तरच्या परीक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आणि न्यायमूर्ती एम. आर. शाह यांना सुनावणी घेतली. वैद्यकीय पदव्युत्तरच्या अंतिम परीक्षा पुढे ढकलण्यासाठी विद्यापीठांना कोणतेही आदेश दिले जाऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निकालात स्पष्ट केले.
हेही वाचा-आंबा, चक्क २ लाख रुपये किलो.. बागेच्या सुरक्षेसाठी ९ श्वान आणि ६ सुरक्षारक्षक
एनएमसीकडून आधीच मार्गदर्शक सूचना आहेत जारी-
राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने (एनएमसी) यापूर्वीच वैद्यकीय विद्यापीठांना परीक्षा घेण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्याकडे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने लक्ष वेधले. वैद्यकीय पदव्युत्तरच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यापूर्वी देशातील कोरोनाची स्थिती लक्षा घ्यावी, असे एनएमसीने मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले होते.
हेही वाचा-गुजरात - अहमदाबादच्या साबरमती नदीत सापडला कोरोना विषाणू
परीक्षेची तारीख निश्चित करण्याचे कोणतेही न्यायिक कारण नाही-
परीक्षेची तारीख निश्चित करण्याचे कोणतेही न्यायिक कारण दिसत नसल्याचे खंडपीठाने निरीक्षण नोंदविले. वरिष्ठ वकील संजय हेगडे यांनी २९ डॉक्टरांच्यावतीने वैद्यकीय पदव्युत्तरच्या अंतिम परीक्षा पुढे ढकलण्याकरिता न्यायालयात म्हणणे मांडले. वैद्यकीय विद्यापीठांना एनएमसीने निर्देश द्यावेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी मिळावी, असे वरिष्ठ वकील हेगडे यांनी याचिकेत म्हटले होते.
न्यायालय हे परीक्षांकरिता योग्य वेळ कसे ठरवू शकते
परीक्षेची तयारी करण्यासाठी कधी योग्य वेळ ठरेल, हे आम्हाला माहित नाही. न्यायालय हे योग्य वेळ कसे ठरवू शकते? प्रत्येकाचा त्यांच्यासाठी योग्य वेळ असू शकतो. एनएमसीच्या मागर्दर्शक सूचनांप्रमाणे एनएमसीला परीक्षेच्या तारखा ठरवू द्या, असे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निकालात म्हटले आहे.
दरम्यान, वैद्यकीय पदव्युत्तरच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी कोरोनाच्या काळात अनेक रुग्णालये व कोव्हिड सेंटरमध्ये रुग्ण सेवा बजावित आहेत. डॉक्टरांची अपुरी संख्या पाहता केंद्र सरकारने वैद्यकीय पदव्युत्तरच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी दिली आहे.