नवी दिल्ली : गुंड-राजकारणी असलेल्या मुख्तार अन्सारीला पंजाबच्या तुरुंगातून उत्तर प्रदेशच्या तुरुंगात नेण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले. याठिकाणी होणाऱ्या सुनावण्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दोन आठवड्यांमध्ये त्याला उत्तर प्रदेशला नेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. अन्सारी सध्या यूपीमधील मउ मतदारसंघाचा आमदार आहे.
मुख्तार अन्सारी सध्या पंजाबच्या रुपनगर जिल्हा तुरुंगात कैद आहे. याठिकाणी राहूनच तो उत्तर प्रदेशमध्ये आपली बेकायदेशीर कृत्ये करत असल्याची तक्रार उत्तर प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात केली होती. यानंतर पंजाब सरकारने तातडीने मुख्तारला उत्तर प्रदेश सरकारच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी ३ मार्चला करण्यात आली होती.
चांगला क्रिकेटपटू ते वॉन्टेड क्रिमिनल..
एकेकाळी चांगला क्रिकेटपटू असणारा अन्सारी पुढे अंडरवर्ल्डमध्ये गेला होता. त्यानंतर वाराणसी आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिमी भागात त्याने मोठा धुडगूस घातला होता. भाजपा नेते कृष्णानंदा राय यांच्या हत्येमधील मुख्य आरोपी म्हणूनही त्याचे नाव पुढे आले होते. यानंतर एका खंडणीच्या प्रकरणात अटक झाल्यानंतर त्याला पंजाबच्या तुरुंगात टाकण्यात आले होते. तेव्हापासून उत्तर प्रदेश सरकार अन्सारीचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
अन्सारीचाही होणार गेम?
भाजपा नेत्याच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी असलेला अन्सारी २०१७च्या आधीपासूनच फरार होता. २०१७ साली यूपीमध्ये भाजपा सरकार आल्यानंतर तर अन्सारीला आणखी भीती वाटत होती. यूपी पोलिसांचे आतापर्यंतचे रेकॉर्ड पाहता, अन्सारीही पळून जाण्याच्या प्रयत्नात एन्काऊंटरमध्ये मारला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा :पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेश दौऱ्यावर; राष्ट्रीय शहीद स्मारकाला दिली भेट