नवी दिल्ली :सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मोहन एम. शांतनागोदर यांचे निधन झाले आहे. ते ६२ वर्षांचे होते. दिल्लीच्या गुरुग्राममधील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
शांतनागोदर यांना फुफ्फुसांचा आजार झाल्यामुळे मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती स्थिर होऊ लागली होती. मात्र, शनिवारी रात्री १२.३०च्या सुमारास डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याचे घोषित केले.
शांतनागोदर यांना कोरोनाची लागण झाली होती, वा नव्हती याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही. १७ फेब्रुवारी २०१७ला त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली होती.
५ मे १९५८ला कर्नाटकमध्ये त्यांचा जन्म झाला होता. तर, ५ सप्टेंबर १९८०ला ते वकील झाले. त्यानंतर १२ मे २००३ला ते कर्नाटक उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून रुजू झाले. २००४च्या सप्टेंबरमध्ये ते पूर्णवेळ न्यायाधीश झाले. त्यानंतर त्यांची नियुक्ती केरळ उच्च न्यायालयात करण्यात आली. २२ सप्टेंबर २०१६ला ते केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून रुजू झाले.
हेही वाचा :जयपूर गोल्डन हॉस्पिटल दुर्घटना : मृतांचे नातेवाईक शोधतायत उत्तरं...