नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानं देशभरात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. त्यावर आज सुनावणी पार पडली. यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता (Tushar Mehta) यांनी केंद्र सरकारकडून जम्मू काश्मीरमध्ये मतदार याद्या अपडेट करण्याचं काम सुरू आहे. कधीही मतदान घेण्यास सरकार तयार असल्याचंही तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं. मात्र जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्यास किती वेळ लागेल, याबाबत केंद्र सरकारकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. (SC Hearing On Article 370)
मतदार यादी अपडेट करण्याचं काम सुरू : सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत केंद्र सरकारच्या वतीनं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी माहिती दिली. केंद्र सरकार जम्मू काश्मीरमध्ये कधीही निवडणुका घेण्यासाठी तयार असल्याचं तुषार मेहता यांनी सांगितलं. जम्मू काश्मीरमधील मतदार यादी अपडेट करण्याचं काम सुरू आहे. बरच काम पूर्ण झालं आहे. जम्मू काश्मीरमधील जिल्हा परिषदेच्या निवडणुका यापूर्वीच झाल्या आहेत. आता जम्मू काश्मीरमध्ये लवकरच पंचायत निवडणुका होणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. लेहमधील निवडणुका संपल्या असून कारगिलच्या निवडणुका सप्टेंबरमध्ये होणार असल्याची माहितीही तुषार मेहता यांनी यावेळी दिली आहे.
जम्मू काश्मीरला हळूहळू देणार राज्याचा दर्जा : जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर तेथील परिस्थिती आता फार बदलली आहे. त्यामुळे पुन्हा जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्यासाठी हळूहळू पावलं उचलली जातील. जम्मू काश्मीरमध्ये आगामी काळात विधानसभेची निवडणूक होणार आहे. मात्र जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा कधीपर्यंत देण्यात येईल, याबाबत कोणतीही माहिती तुषार मेहता, यांनी दिली नाही.
कलम 370 हटवल्यानं घुसखोरीत घट : जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर मोठा बदल झाला आहे. जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या दहशतवादी कारवायावर मोठा अंकुश लागल्याची माहिती तुषार मेहता यांनी दिली. यात दहशतवादी कारवायात 45 टक्के घट झाली आहे. तर घुसखोरी 90.2 टक्के कमी झाली आहे. जवानांमधील घातपातात 65.9 टक्के घट झाली, तर दगडफेकीच्या घटनाही 97 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. 2018 मध्ये दगडफेकीच्या 1767 घटना घडल्या होत्या, मात्र यावर्षी दगडफेकीच्या शून्य घटना घडल्याची माहिती तुषार मेहता यांनी दिली. काश्मीरच्या तरुणांना रोजगार उपलब्ध करुन दिल्यामुळेच हा बदल झाल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
हेही वाचा :
- Supreme Court hearing on Article 370: सर्वोच्च न्यायालयात कलम 370 वर सुनावणी, घटनापीठात मुख्य न्यायाधीशांसह पाच न्यायाधीशांचा समावेश
- Uddhav Thackeray Jammu Kashmir Visit : काश्मिरी पंडितांशी चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे जम्मू कश्मीरला जाण्याची शक्यता
- Winter Games in Gulmarg : काश्मीर खोऱ्यात लष्कराचे खेळांना प्रोत्साहन, गुलमर्गमध्ये हिवाळी खेळांचे आयोजन केले