नवी दिल्ली :सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने उच्च न्यायालयांच्या 23 न्यायमूर्तींची बदली करण्याची शिफारस केली आहे. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॉलेजियमच्या बैठकीत या बदल्यांची शिफारस केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियममध्ये सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड, न्यायमूर्ती एस के कौल, न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा समावेश आहे.
उच्च न्यायालयाच्या 23 न्यायाधीशांची बदली :देशातील न्यायदानाचे काम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने उच्च न्यायालयांमधील 23 न्यायाधीशांची बदली करण्याची शिफारस केली आहे. ही शिफारस कॉलेजियमने सरकारकडे केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियममधील सदस्य असलेल्या न्यायमूर्ती एस के कौल, न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याबाबतची शिफारस केली आहे.
कोणत्या न्यायाधीशांच्या बदलीची शिफारस :न्यायमूर्ती विवेक कुमार सिंग यांची अलाहाबाद उच्च न्यायालयातून मद्रास उच्च न्यायालयात बदलीची शिफारस करण्यात आली आहे. न्यायमूर्ती अल्पेश वाय कोगजे यांची गुजरात उच्च न्यायालयातून अलाहाबाद उच्च न्यायालयात बदलीची शिफारस करण्यात आली आहे. न्यायमूर्ती कुमारी गीता गोपी यांची गुजरात उच्च न्यायालयातून मद्रास उच्च न्यायालयात बदलीची शिफारस करण्यात आली आहे. न्यायमूर्ती हेमंत एम प्रच्छक यांची गुजरात उच्च न्यायालयातून पाटणा उच्च न्यायालयात, न्यायमूर्ती समीर जे दवे यांची गुजरात उच्च न्यायालयातून राजस्थान उच्च न्यायालयात, न्यायमूर्ती अरविंद सिंग सांगवान यांची पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयातून अलाहाबाद उच्च न्यायालयात, न्यायमूर्ती अवनीश झिंगन यांची पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयातून गुजरात उच्च न्यायालयात, न्यायमूर्ती राज मोहन सिंग यांची पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयातून मध्य प्रदेश उच्च न्यायालयात आणि न्यायमूर्ती अरुण मोंगा यांची पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयातून राजस्थान उच्च न्यायालयात बदलीची शिफारस करण्यात आली आहे.
विशेष विनंती बदल्यांचीही शिफारस :सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयांमधील 23 न्यायाधीशांच्या बदलीची शिफारस सरकारकडे केली आहे. यात विनंती बदल्यांचीही शिफारस करण्यात आली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती प्रकाश पाडीया यांची झारखंड येथील उच्च न्यायालयात बदली करण्याची शिफारस करण्यात आली आहे. मात्र न्यायमूर्ती प्रकाश पाडीया यांनी बदली ठिकाणचा विचार करण्याची विनंती कॉलेजियमला केली. त्यांनी मध्यप्रदेश उच्च न्यायालय, पाटणा उच्च न्यायालय किंवा उत्तराखंड उच्च न्यायालयात बदलीची विनंती केली होती. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी मानवेंद्रनाथ रॉय यांची गुजरात उच्च न्यायालयात बदलीची शिफारस करण्यात आली होती. मात्र न्यायमूर्ती सी मानवेंद्रनाथ रॉय यांनी तेलंगाणा उच्च न्यायालयात बदलीची विनंती केली आहे. यासह दहा विविध विनंती बदल्यांची शिफारसही करण्यात आली आहे.
हेही वाचा -
- Judges Transferred: CJI DY चंद्रचूड यांनी पहिल्याच बैठकीत केली तीन न्यायाधीशांची बदली.. ठिकठिकाणी वकिलांचा विरोध