नवी दिल्ली SC ban On firecrackers: सर्वोच्च न्यायालयानं फटाके संघटनेला पुन्हा एकदा चांगलाच दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानं फटाक्यावर 2018 ची बंदी कायम राहील, असे आदेश शुक्रवारी दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए एस बोपण्णा आणि न्यायमूर्ती एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठानं हा आदेश दिला. फटाके संघटनेनं ग्रीन फटाक्यांमध्ये उत्तम फॉर्म्युलेशनसह बेरियम समाविष्ट करण्यासाठी दाखल केलेली याचिका खंडपीठानं फेटाळून लावली आहे.
काय दिले सर्वोच्च न्यायालयानं आदेश :फटाक्यांमध्ये बेरियमच्या वापरावर बंदी घालणारे यापूर्वीचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवले आहेत. फटाक्यांच्या वापरावर फटाके असोसिएशनच्या दुसर्या अर्जावर विचार करण्यासही न्यायमूर्ती ए एस बोपण्णा आणि न्यायमूर्ती एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठानं नकार दिला आहे. देशभरातील सर्व प्राधिकरणांना या बंदीची काटेकोरपणानं अंमलबजावणी करण्याचं सर्वोच्च न्यायालयानं बजावलं आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये ग्रीन फटाक्यांसह फटाक्यांची संपूर्ण बंदी कायम राहणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. इतर राज्यांमध्ये ग्रीन फटाक्यांना परवानगी असेल, असंही सर्वोच्च न्यायालयानं यावेळी सांगितलं. 14 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयानं बंदी असतानाही नागरिक फटाके कसे फोडत आहेत, असा प्रश्न केंद्र सरकारला विचारला होता. फटाक्यांवर कारवाई करणं हा उपाय नाही, तर स्त्रोत शोधून कारवाई करणं यावर भर दिला पाहिजे, असंही सर्वोच्च न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं होतं.