नवी दिल्ली : हिंदी चित्रपटसृष्टीतील उत्तम दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेते सतीश कौशिक आता आपल्यात नाहीत. यावर्षीची होळी खेळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. यावेळी सतीश यांनी दिल्लीतील फार्महाऊसवर होळी खेळली. मात्र आता या प्रकरणाशी संबंधित मोठी माहिती पूढे येत आहे. दिल्ली पोलिसांना होळी उत्सवाच्या ठिकाणाहून म्हणजे फार्म हाऊसमधून संशयास्पद औषधे मिळाली आहेत. या प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्यासाठी दिल्ली पोलिसांनी होळी उत्सवासाठी आलेल्या प्रत्येक पाहुण्यांची चौकशी सुरू केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सतीश कौशिकच्या होळी सेलिब्रेशनमध्ये एक वाँटेड बिझनेसमनही उपस्थित होता. सध्या दिल्ली पोलीस अभिनेत्याच्या पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत. याआधी होळी साजरी करण्यास सहभागी झालेल्या 10 ते 12 जणांची यादी तयार करण्यात येत आहे.
होळीच्या पार्टीला आरोपी व्यापारी उपस्थित होता : सतीश कौशिक यांचा विकास मालू नावाचा मित्रही या होळी पार्टीत सहभागी झाला होता. तो दुबईत राहतो आणि होळी साजरी करण्यासाठी दिल्लीत आला होता. विकास बिजवासन यांच्या नावाचे हे फार्म हाऊस आहे. गुटखा किंग मालू आणि सतीश कौशिक ज्या फार्म हाऊसमध्ये पार्टी करत होते, ते त्याच्या मालकीचे आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मालूवर आपल्या पत्नीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे आणि या प्रकरणी त्याच्याविरोधात एफआयआरही नोंदवण्यात आला आहे.