बंगळुरू :'एआयएडीएमके'मधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नेत्या शशीकला यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, त्यांना आता आयसीयूमधून बाहेर काढण्यात आल्याची माहिती बंगळुरूमधील रुग्णालयाने दिली आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात शशिकला या सध्या शिक्षा भोगत आहेत. काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना व्हिक्टोरिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या एकेकाळच्या निकटवर्तीय असलेल्या शशिकला यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगवास देण्यात आला होता. २७ जानेवारीला त्यांची तुरुंगातून सुटका होणार आहे. कोरोनाची लक्षणे दिसताच त्यांना २० जानेवारीला बौरिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळल्यामुळे त्यांना व्हिक्टोरिया रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होते. आता त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्यामुळे त्यांना अतिदक्षताविभागातून सामान्य विभागात हलवण्यात आले आहे.
यासोबतच, त्यांच्या वहिनी जे. इलावरासी यांनाही या प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. तसेच, त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यांच्यावरदेखील उपचार सुरू असल्याची माहिती तुरुंग प्रशासनाने दिली आहे.