दिल्लीत किसान मोर्चाची महापंचायत नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चातर्फे दिल्लीतील रामलीला मैदानावर आयोजित करण्यात येणाऱ्या महापंचायतीसाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. यामध्ये दिल्ली पोलिसांसह पॅरा मिलिटरी जवानही मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले आहेत. परराज्यातून येणाऱ्या लोकांवर दिल्ली पोलिसांची विशेष नजर आहे.
दिल्लीच्या सीमेवर बॅरिकेटिंग: दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या गाझीपूर सीमेवर उत्तर प्रदेशातून येणाऱ्या वाहनांवर विशेष नजर ठेवली जात आहे. तेथे सीमेवर बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. तसेच संशयास्पद वाहनांना थांबवून त्यांची कागदपत्रे तपासली जात आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग 24 वर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जामची परिस्थिती निर्माण झाली असून वाहतुकीचा वेगही मंदावला आहे. आज सोमवार असल्यामुळे रस्त्यांवर जास्त वर्दळ आहे. त्यामुळे लोकांना ऑफीसेस मध्ये जाण्यास त्रास होतो आहे.
15 ते 20 हजार शेतकरी धडकणार : गाझीपूर सीमेशिवाय आनंद विहारच्या महाराजपूर सीमा, नोएडा सीमा, अप्सरा सीमा आणि लोनी सीमेवरही बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. रामलीला मैदानावर आयोजित महापंचायतीत सुमारे 15 ते 20 हजार शेतकरी सहभागी होऊ शकतील, असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे. या पार्श्वभूमीवर रामलीला मैदान आणि परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
पर्यायी मार्गांचा वापराचा सल्ला : संयुक्त किसान मोर्चातर्फे दिल्लीतील रामलीला मैदानावर सोमवारी महापंचायत होणार असल्याची घोषणा रविवारी करण्यात आली होती. यासाठी देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील लाखो शेतकरी दिल्लीत पोहोचणार आहेत. रविवारी या संबंधी संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांची बैठक झाली होती. हे लक्षात घेऊन लोकांना रामलीला मैदानाभोवतीचे रस्ते, विशेषत: दिल्ली गेट ते अजमेरी गेट चौकापर्यंतचे रस्ते टाळून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सकाळपासूनच शेतकरी महापंचायतीसाठी रामलीला मैदानावर पोहोचत आहेत.
हे ही वाचा :Amritpal Singh Arrest Issue : अमृतपालला अटक करण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरूच, काका आणि ड्रायव्हर पोलिसांना शरण