संकष्टी चतुर्थीचा उपवास पश्चिम आणि दक्षिण भारतात विशेषत महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये पाळला जातो. हा उपवास दोन प्रकारांनी करतात. मिठाची संकष्ट चतुर्थी व पंचामृती चतुर्थी. एका महिन्यात दोन चतुर्थ्या येतात. पहिली संकष्टी आणि दुसरी विनायकी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी कृष्ण पक्षात येते आणि विनायकी शुक्ल पक्षात येते. दोन्ही चतुर्थी गणपतीला समर्पित आहेत. या दिवशी उपवास करण्याचीही प्रथा आहे. 2023 मध्ये संकष्टी चतुर्थी कधी येत आहे आणि त्याचे महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया.
संकष्टी चतुर्थीचे महत्व :संकष्टी चतुर्थीला गणेशाचे भक्त सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत उपवास करतात. संकष्टी म्हणजे संकटकाळात सुटका. भगवान गणेश, बुद्धिमत्तेचा सर्वोच्च स्वामी, सर्व अडथळे दूर करणाऱ्या देवांचे प्रतीक आहे. म्हणून असे मानले जाते की, हे व्रत केल्याने सर्व बाधा दूर होतात. हा उपवास कठोर आणि फक्त फळे, मुळे आणि भाजीपाला खाऊन करणे आवश्यक आहे. संकष्टी चतुर्थीच्या मुख्य भारतीय आहारात साबुदाणा खिचडी, बटाटा आणि शेंगदाणे यांचाही समावेश होतो. काही भाविक कुठलेही मिठाचे पदार्थ न खाता दिवसभर उपवास करतात. रात्री चंद्रदर्शन झाल्यानंतर भाविक उपवास सोडतात.
संकष्टी चतुर्थी पूजा विधी :प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणालाही करता येते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा केली जाते. या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे. पाण्यात तीळ मिसळून अर्घ्य अर्पण करावे. या दिवशी व्रत ठेवल्यास विशेष लाभ मिळतो. संध्याकाळी गणेशाची विधिवत पूजा करावी. यानंतर देवाला दूर्वा अर्पण करावा. ज्योतिष शास्त्रानुसार असे केल्याने धन आणि सन्मान वाढतो. गणपतीला मोदक प्रिय असल्याने रात्री मोदकाचा नैवेद्य दाखवावा.
संकष्टी चतुर्थी - 2023 तारखा : 10 जानेवारी 2023 मंगळवार रोजी अंगारकी चतुर्थी आहे. 09 फेब्रुवारी गुरुवार रोजी संकष्टी चतुर्थी आहे. 11 मार्च शनिवार रोजी संकष्टी चतुर्थी आहे. 09 एप्रिल रविवार रोजी संकष्टी चतुर्थी आहे. 08 मे सोमवार रोजी संकष्टी चतुर्थी आहे. 07 जून बुधवार रोजी संकष्टी चतुर्थी आहे. 06 जुलै गुरुवार रोजी संकष्टी चतुर्थी आहे. 04 ऑगस्ट शुक्रवार रोजी संकष्टी चतुर्थी आहे. 03 सप्टेंबर रविवार रोजी संकष्टी चतुर्थी आहे. 19 सप्टेंबर मंगळवार रोजी गणेश चतुर्थी आहे. 28 सप्टेंबर गुरुवार रोजी अनंत चतुर्दशी आहे. 02 ऑक्टोबर सोमवार रोजी संकष्टी चतुर्थी आहे. 01 नोव्हेंबर बुधवार रोजी संकष्टी चतुर्थी आहे. 30 नोव्हेंबर गुरुवार रोजी संकष्टी चतुर्थी आहे. 30 डिसेंबर शनिवार रोजी संकष्टी चतुर्थी आहे.