नवी दिल्ली -आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. ही बैठक संपली असून राऊत यांनी भाजपविरोधी युतीबाबत भाष्य केले आहे. काँग्रेसशिवाय असणारी कुठलीही युती ही भाजपशी दोन हात करण्यात समर्थ असू शकत नाही, असे ते म्हणाले.
हेही वाचा -Padma Shri Nanda Sir Passes Away : 104 वर्षीय पद्मश्री नंदा सरांचे निधन
एकच विरोधी आघाडी असावी. शरद पवार हे मोठे आणि शक्तीशाली नेते आहेत. काँग्रेस आणि तृणमूलमधील मतभेदांवर ते निर्णय घेतील, असेही राऊत म्हणाले. आज राहुल गांधी यांना भेटल्यानंतर उद्या ते काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना भेटणार आहेत.
काँग्रेस शिवाय युती..! काय आहे प्रकरण?
2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रातून भारतीय जनता पक्षाला सत्तेतून हटवायचे असेल तर, देशातील सर्व प्रादेशिक पक्षाने एकत्र येऊन तिसरी आघाडी तयार करण्याबाबत ममता बॅनर्जी यांनी बैठकीत मुद्दा उपस्थित केला होता. तसेच विरोधी पक्षात असूनही काँग्रेस आपली भूमिका चोख बजावत नसल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना ममता बॅनर्जी यांनी खंत व्यक्त केली होती.
केंद्र सरकार विरोधात लढण्यासाठी एक मजबूत पर्याय उभा करणे गरजेचे आहे. मात्र, जे विरोधात आहेत ते केंद्र सरकारशी लढायला तयार नाहीत, असे नाव न घेता काँग्रेसला टोलाही यावेळी ममता बॅनर्जी यांनी लगावला होता. तसेच, देशात मोदींचे सरकार आल्यानंतर फॅसिझम सुरू झाला असून त्या विरोधात सर्वांनी उभ राहिले पाहिजे. यासाठी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीआधी तिसरी आघाडी निर्माण करण्याची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या होत्या. ममता या मुंबई दौऱ्यावर असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली होती.
ममतांच्या विधानानंतर राजकीय चर्चांना उधान
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सदर टोल्यानंतर राज्यातील काँग्रेस पक्षातील नेत्यांनी त्यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली होती. काँग्रेस शिवाय युती चालणार नाही, काँग्रेस देशव्यापी पक्ष आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या काही नेत्यांनी दिली होती.
हेही वाचा -संजय राऊत, राहुल गांधी यांची बैठक संपली; काँग्रेसशिवाय युतीबाबत राऊत म्हणाले...