मुंबई - खासदार संजय राऊत यांनी फारूख अब्दुलांवर टीकास्त्र सोडले आहे. कलम 370 लागू करायची असेल, तर त्यांनी पाकिस्तानात जावे आणि तिथे कलम 370 लागू करावी. भारतात कलम 370 ला कोणतीही जागा नाही, असे संजय राऊत म्हणाले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. कलम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीर मधील नेते आक्रमक झाले आहेत. कलम 370 पुन्हा लागू करण्याची मागणी फारूख अब्दुला यांच्या सह काश्मीरात नेत्यांनी केली आहे आणि कलम परत लागू करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी काश्मीरातील नेत्यांनी गुपकर पक्षाची स्थापना केली आहे.
जम्मू काश्मीरमधील नेते आक्रमक...
गेल्यावर्षी कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरला प्राप्त असलेला विशेष दर्जाही नाहीसा झाला होता. मात्र हा दर्जा परत मिळावा, यासाठी काश्मीरमधील सहा मोठे पक्ष एकत्र आले आहेत. नॅशनल कॉन्फरन्स (एनसी), पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) आणि काँग्रेसच्या प्रतिनिधींनी 'पिपल्स अलायन्स फॉर गुपकर डिकलेरेशेन' संघटनेची घोषणा केली आहे.
भाजपाविरोधात लढा देण्यासाठी गुपकरची उभारणी...
गुपकर घोषणापत्रावर सह्या केलेल्या आणि संघटना स्थापन केलेल्या काश्मीरी नेत्यांनी पहिली पत्रकार परिषद घेतली. केंद्र सरकारने मागील वर्षी ५ ऑगस्टला काश्मीरची स्वायत्तता काढून घेतली. ही स्वायत्तता पुन्हा मिळविण्यासाठी काश्मीरी नेत्यांची एकी झाली आहे. कायदेशीर मार्गाने लढा देऊन काश्मीरची स्वायत्तता माघारी घेण्याचा निर्धार नेत्यांनी केला आहे. गुपकर घोषणापत्रासाठी एकत्र आलेली संघटना देशविरोधी नाही तर भाजप देशविरोधी, असे फारुख अब्दुल्ला म्हणाले आहे.
केंद्र सरकारच्या जमीन कायद्यातील बदलांना विरोध...
पीपल्स अलायन्स फॉर गुपकर डिक्लेरेशन' मध्ये सहभागी असलेल्या काश्मीरी पक्षांनी नव्या जमीन कायद्यातील बदलांचा विरोध केला आहे. जम्मू काश्मीर विकायला काढलंय, अशा भावना नेत्यांनी व्यक्त केल्या. 'पीपल्स डेमॉक्रॅटीक पार्टी' ही संघटना काश्मीरातील सर्व पक्षांनी मिळून स्थापन केली आहे. काश्मीरची स्वायत्तता पुन्हा माघारी घेण्याचा उद्देश यामागे आहे.