नवी दिल्ली : एखादी चूक केल्यानंतर त्याचाही इव्हेंट कसा करावा हे केंद्र सरकारकडून शिकण्यासारखे आहे अशी टीका करतानाच एवढा आत्मविश्वास येतो कुठून? असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बुधवारी राज्यसभेत केंद्र सरकारला लगावला. यातला थोडा आत्मविश्वास आम्हालाही द्या, आम्हालाही या आत्मविश्वासाची गरज आहे असेही ते उपहासाने विरोधकांना उद्देशून म्हणाले.
चूक करूनही स्वतःचीच पाठ थोपटली
राज्यसभेत शुक्रवारी 127 व्या घटनादुरूस्ती विधेयकावर चर्चा झाली. यावेळी बोलताना शिवसेना खासदार यांनी घटनादुरूस्तीचे स्वागत करतानाच केंद्र सरकारवरही ताशेरे ओढले. जेव्हा केंद्र सरकारने 2018 मध्ये मागासवर्ग ठरविण्यासंदर्भात राज्यांचे अधिकार कमी करून केंद्रीय मागास आयोगाला अधिकार दिले, तेव्हाच आम्ही असे करू नका असा इशारा दिला होता. सरकारने तेव्हा चूक केली, मात्र चूक करूनही सरकार स्वतःचीच पाठ थोपटून घेत होते. चूक केल्यानंतरही त्याचा इव्हेंट कसा करावा हे केंद्र सरकारकडून शिकण्यासारखे आहे. एवढा आत्मविश्वास नेमका येतो कुठून? एवढा आत्मविश्वास असेल तर त्यातला थोडा आम्हालाही द्या, इकडेही आत्मविश्वासाची गरज आहे असे राऊत म्हणाले.