नई दिल्ली -आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करणारे एसबीचे अधिकारी समीर वानखेडे सोमवारी रात्री दिल्लीला पोहचले आहेत. आर्यनला सोडवण्यासाठी समीर वानखेडे यांच्यासह काही साथीदारांमध्ये 25 कोटी रुपयांचा सौदा झाला असल्याची खळबळजनक माहिती नुकतीच एका पंच'ने व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. त्यानंतर, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यातच, वानखेडे तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे तर्कवितर्कांना उधान आले आहे. दरम्यान, त्यांनी येथील एनसीबी ऑफिसला भेट दिली. यावेळी त्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
'महत्वाच्या कामासाठी मी दिल्लीला आलो आहे'
वानखेडे दिल्ली येथे इंदिरा गांधी अंतरराष्ट्रीय विमान तळावर पोहचल्यावर माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही महत्वाच्या कामासाठी मी दिल्लीला आलो आहे इतकीच माहिती वानखेडे यांनी यावेळी दिली. याशिवाय ते काही बोलले नाहीत.