रोहतास (बिहार) :बिहारच्या रोहतासमध्ये समलिंगी विवाहाचे प्रकरण समोर आले आहे. येथे दोन मुलींनी एकमेकींशी लग्न केले आहे. मात्र यापैकी एक मुलगी अल्पवयीन आहे. या दोघींचा हा विवाह आता चर्चेचा विषय ठरला आहे. आश्चर्याचे म्हणजे, लग्न झाल्यानंतर दोघींनी पोलीस ठाणे गाठून संरक्षणाची मागणी केली.
पळून जाऊन लग्न केले : हे प्रकरण रोहतास जिल्ह्यातील सूर्यपुरा येथील आहे. या दोघींनी घरातून पळून जाऊन लग्न केले आहे. मुलींनी जेव्हा पोलिसांना त्यांच्या लग्नाची माहिती दिली तेव्हा पोलिसही चकित झाले. दोघींपैकी एक मुलगी बीए द्वितीय वर्षात शिकते आहे. तर दुसऱ्या मुलीने नुकतीच 2023 मध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. दोघींमध्ये बऱ्याच दिवसांपासून संबंध होते. दरम्यान, त्यांचे प्रेम वाढत गेले. त्या सोबत ट्यूशनला जायच्या, एकत्र झोपायच्या आणि एकत्र जेवायच्या. त्यांना एकत्र राहायला आवडायचे. त्यांची घरेही एकमेकांसमोर असल्याने त्या सतत एकमेकांच्या घरी जात असत.
मंदिरात केले लग्न : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघींचे लहानपणापासूनच एकमेकींवर प्रेम होते. त्यांनी भालुनी भवानी धाम येथे सर्व धार्मिक विधींनुसार लग्न केले. आता आम्ही दोघीही एकत्र राहणार असल्याचे मुलींनी पोलिसांना सांगितले. मात्र घरच्यांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला तर त्या इथून दुसरीकडे जाऊन एकत्र राहतील, असे त्या म्हणाल्या.