हैदराबाद - डॉ. होमी जहांगीर भाभा यांना विज्ञानसूर्य असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांचे या क्षेत्रातील योगदान अतिशय महत्वाचे आहे. त्यांचा जन्म पारशी कुटुंबात झाला. त्यांच्या घरी सुबत्ता असल्याचे त्यांचे बालपण सुखासीन होते. डॉ. भाभा यांचे वडील जहांगीर भाभा हे बॅरिस्टर होते. त्यांना वाचनाची आवड होती. त्यामुळे घरातच खूप पुस्तके होती. विज्ञानाच्या पुस्तकांच्याकडे होमी भाभा यांचा जास्त कल होता. विज्ञान विषयाची पुस्तके वाचण्याचा त्यांनी सपाटा लावला. होमी भाभा यांना या वाचनातून लहानपणीच विज्ञानाची आवड निर्माण झाली. त्याचबरोबर ते हळव्या ह्रदयाचे कवीही होते. त्यांना चित्रकलेचा छंदही होता. अतिशय देखणे व्यक्तिमत्त्व लाभलेले होमी भाभा हे माणूस म्हणूनही एक उत्तम व्यक्ती होते. त्यांच्या या वाचनाच्या सवयीमुळे त्यांचे विचार समृद्ध झाले होते.
भाभांचे शिक्षण - होमी भाभा यांचे प्राथमिक शिक्षण तसेच पदवी पर्यंतचे शिक्षण मुंबईमध्ये झाले. होमी यांनी इंजिनियर व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. पण होमी यांनी त्यांना गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय विशेष आवडतात असे वडिलांना ठामपणे सांगितले. वडिलांनी शेवटी गणिताचा अभ्यास करण्यास परवानगी दिली. मात्र त्यापूर्वी इंजिनियरिंगची पदवी मिळवण्याची अट घातली. वडिलांनी परवानगी दिल्यावर होमी भाभा केंब्रिज विद्यापीठातून १९३० साली इंजिनियर झाले. तिथेच ते पॉल डिरॅक यांच्या मार्गदर्शनाखाली गणिताचा अभ्यासही करीत राहिले. कॅव्हेंडिश लॅबोरेटरीत न्यूक्लिअर फिजिक्सचा अभ्यास करून १९३३ साली त्यांनी डॉक्टरेट मिळवली.
वैज्ञानिक कार्य - डॉक्टरेट मिळवल्यानंतर १९४० साली होमी भाभा भारतात परत आले. त्यानंतर त्यांनी काही काळ भारतीय विज्ञान संस्था, बंगलोर येथे प्रोफेसर म्हणून काम केले. पुढे १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना करण्यात मदत केली. आपले संशोधन कार्य संभाळून डॉ. भाभा हे टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे संचालक म्हणूनही योगदान देत राहिले.