नवी दिल्ली : शाहबाद डेअरी परिसरात तरुणीचा खून केल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपी साहिल याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. मात्र दोन वर्षापूर्वी देखील शाहबाद डेअरी परिसरातील नागरिकांनी साहिलला कुटूंबासह पळवून लावले होते. कॉलनीतील नागरिकांशी सतत भांडण करत असल्याने नागरिकांनी साहिलला हद्दपार केले होते. मात्र नागरिकांनी पाकलून लावल्यानंतर साहिल जैन कॉलनीत राहू लागल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली. नागरिकांनी हाकलून लावल्यानंतरही साहिल मुलीसह आसपासच्या गार्डनमध्ये दिसत असल्याचेही नागरिकांनी यावेळी स्पष्ट केले.
साहिलने सांगितलेल्या तथ्यांची चौकशी केली जात आहे. पोलिसांचे पथक वैज्ञानिक पुरावे गोळा करण्यात गुंतले आहेत. खुनाच्या वेळी व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसणार्या सर्व 12 जणांचे जबाबही नोंदवण्यात येणार आहेत - रवी कुमार सिंह, पोलीस उपायुक्त
कामाच्या बहाण्याने येत होता कॉलनीत :शाहबाद डेअरी येथून जैन कॉलनीत स्थलांतरित होऊनही आरोपी साहिलने परिसरात येणे सोडले नाही. तरुणीला भेटण्यासाठी साहिल एक ना एक बहाणा करून शाहबाद डेअरीत जात असे. कधी कामाच्या बहाण्याने तर कधी कुणाला भेटण्याच्या बहाण्याने साहिल या परिसरात फिरकत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. तो अनेकदा मुलीसोबत जवळच्या पार्कमध्ये दिसत असल्याचेही नागरिकांनी स्पष्ट केले. नागरिकांकडून अडवणूक होऊनही तो आपल्या कृत्यांपासून परावृत्त झाला नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.