शारजा : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने नुकताच आपला 50 वाढदिवस साजरा केला आहे. सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसाला दुबईतील जगप्रसिद्ध शारजाह मैदानात मोठा सन्मान करण्यात आला आहे. आता जगप्रसिद्ध असलेल्या शारजाह मैदानात सचिन तेंडुलकर स्टँड उभारण्यात आला आहे. त्यामुळे सचिनसह भारतीयांची मान अभिमानाने उंचावली गेली आहे.
जगप्रसिद्ध शारजा मैदानावर सचिनचे आहेत विक्रम :मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसानिमित्त शारजावर सोमवारी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शारजाह क्रिकेट स्टेडियमच्या वेस्ट स्टँडचे नामकरण सचिन तेंडुलकर स्टँड असे करण्यात आले. सचिन तेंडुलकरने 1998 मध्ये खचाखच भरलेल्या स्टेडियमसमोर ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॅक टू बॅक शतक ठोकले होते. सचिन तेंडुलकरने सलग दोन शतक ठोकल्याचा हा 25 वा वर्धापन दिन आहे. सचिन तेंडुलकरने 22 एप्रिलला भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील तिरंगी मालिकेत 143 धावा केल्या होत्या. त्यानंतर दोन दिवसांनी कोका कोला कपच्या अंतिम सामन्यात 134 धावा केल्या होत्या. त्यामुळे सचिन तेंडुलकरचा हा शारजाहवरील विक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. सचिन तेंडुलकरने एकदिवसीय सामन्यांमध्ये 49 शतके झळकावली आहेत. या खेळीदरम्यान सचिन तेंडुलकर तब्बल 34 विविध स्टेडियममध्ये खेळला आहे. मात्र शारजाह क्रिकेटच्या मैदानावर सचिन तेंडुलकरने 7 शतके झळकावली आहेत. त्याचा हा विक्रम अद्यापही अबाधित आहे.
सचिन तेंडुलकरने व्यक्त केली कृतज्ञता :शारजाह या जगप्रसिद्ध मैदानावर सचिन तेंडुलकरच्या खास खेळी केल्याच्या आठवणी आहेत. त्यामुळे शारजाह मैदानावरील वेस्ट स्टँडचे नामकरण सचिन तेंडुलकर स्टँड करण्यात आले आहे. या स्टँडच्या नामकरणावर सचिनने कृतज्ञता व्यक्त केली आहे. मला तिथे असण्याची इच्छा आहे, मात्र पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मी उपस्थित राहू शकत नसल्याचे सचिनने आपल्या संदेशात नमूद केले आहे. शारजाहमध्ये खेळणे हा माझ्यासाठी नेहमीच चांगला अनुभव राहिला आहे. रोमहर्षक वातावरणापासून ते प्रेम, आपुलकी आणि पाठिंब्यापर्यंत शारजा हे जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी आणि क्रीडाप्रेमींसाठी एक खास ठिकाण आहे. याने आम्हाला अनेक खास क्षण दिल्याचेही सचिनने यावेळी सांगितले. डेझर्ट स्टॉर्म मॅचच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त आणि 50 व्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांबद्दल सचिनने खलाफ बुखातीर आणि त्यांच्या टीमचे आभार व्यक्त केले आहेत.
शारजावर सर्वाधिक सामने खेळल्याचा विक्रम :शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये आजही सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळल्याचा गिनीज रेकॉर्ड आहे. आतापर्यंत शारजाहवर 244 सामने खेळवण्यात आले आहेत. त्यासह हे मैदान क्रिकेट इतिहासातील काही अविस्मरणीय क्षणांचे साक्षीदार आहे. सचिनने क्रिकेट खेळासाठी खूप काही केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आमचा छोटासा मार्ग असल्याचे शारजाह स्टेडियमचे सीईओ खलाफ बुखातीर यांनी सांगितले. ही एक अविश्वसनीय खेळी होती आणि अंतिम फेरीत त्याची पुनरावृत्ती झाल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा - IPL 2023 : घरच्या मैदानावर गुजरात टायटन्स घेणार मुंबईचा बदला?