पठाणमथिट्टा- केरळमधील शबरीमाला मंदिरातील मकरविलक्कू हंगाम 20 जानेवारीला संपणार आहे. यावर्षी मंदिराच्या महसूलात प्रचंड वाढ झाली असून मंदिर महसूलाच्या बाबतीत नवा विक्रम नोंदवण्यात येणार असल्याचे वर्तवण्यात येत आहे. मंदिरात अद्यापही देणग्यांची मोजणी सुरू आहे. हुंड्यांमधून जमा झालेल्या नाण्यांची मोजणी पूर्ण होण्यास काही दिवस लागू शकतात. तर 7 कोटी किमतीची नाणी अद्यापही मोजायची बाकी आहेत. त्यासाठी आणखी साठ लोकांची नियुक्ती करण्यात आली आहे. निलक्कल आणि पंबा येथील आणखी दोन हुंडया उघडल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मंदिराला 330 कोटींचा मिळणार महसूल :शबरीमाला मंदिराला आत्तापर्यंत 318 कोटींचा महसूल मिळाला आहे. या हंगामात नवा उच्चांक नोंदवला जाणार आहे. तर वर्षभरात हा आकडा 330 कोटींवर जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. भाविकांनी शबरीमला देवस्थानाला भरभरुन दान केले आहे. त्यामुळे या देवस्थानाकडे यावर्षी देणगींचा नवा उच्चांक स्थापन करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मोजणीला उशीर झाल्यामुळे नोटांचे नुकसान :शबरीमाला देवस्थानातील देणगीच्या मनोजणीला यावेळी उशीर झाला आहे. त्यामुळे देणगीतील अनेक नोटा खराब झाल्या आहेत. भाविकांनी दिलेले दान असे खराब झाल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. भाविकांनी शबरीमाला देवस्थानाला भरुभरुन दान दिले आहे. मात्र देवस्थानाच्या कारभारामुळे त्या दानातील लाखो रुपयांच्या नोटा खराब झाल्या आहेत. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.