नागपूर S Jaishankar : परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी शनिवारी नागपुरात बोलताना भारत-चीन राजनैतिक संबंधांबद्दल मोठं वक्तव्य केलं. "दोन्ही बाजूंनी तयारी दाखवल्याशिवाय सीमाप्रश्नावर तोडगा काढणं शक्य नाही", असं ते म्हणाले.
संबंध सामान्य करण्यासाठी काम चालू : "मी चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांना समजावून सांगितलंय की, जोपर्यंत तुम्ही सीमा वादावर तोडगा काढत नाही आणि जोपर्यंत सैन्य तेथे आमनेसामने राहतील, तोपर्यंत तुम्ही बाकीचे संबंध सामान्य राहण्याची अपेक्षा करू शकत नाही. हे अशक्य आहे", असं ते म्हणाले. "दोन्ही देश संबंध सामान्य करण्यासाठी काम करत आहेत. काहीवेळा राजनैतिक अडथळे दूर होण्यास वेळ लागतो", असं त्यांनी नमूद केलं.
भारताच्या सल्ल्याशिवाय निर्णय होत नाही : अरुणाचल प्रदेशातील गलवान व्हॅलीमध्ये चिनी सैन्यासोबत झालेल्या संघर्षाच्या वेळी भारतीय सैनिकांनी दाखवलेल्या धाडसामुळे चीन आणि जगाला भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्यास भाग पाडलं. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या या अलीकडच्या वक्तव्याचा संदर्भ देत जयशंकर म्हणाले की, जगातील कोणत्याही मोठ्या मुद्द्यावर भारताच्या सल्ल्याशिवाय निर्णय झालेला नाही. "जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत आहे. कोणत्याही मोठ्या जागतिक मुद्द्यावर भारताशी सल्लामसलत केल्याशिवाय निर्णय होत नाही. जागतिक मुद्द्यांवर भारताची संमती अत्यंत महत्त्वाची आहे. आपण बदललो आहोत आणि जगाची आपल्याबद्दलची धारणा बदलली आहे," असं ते यावेळी म्हणाले.
आपला स्वभाव स्वतंत्र राहण्याचा : "आपण स्वतंत्र आहोत. वेगवेगळ्या लोकांशी व्यवहार करून आपलं हित कसं साधायचं हे शिकायला हवं", असं जयशंकर यांनी सांगितलं. आपला स्वभाव स्वतंत्र राहण्याचा आहे. आपण दुसऱ्याच्या उपक्रमाचा भाग बनू शकत नाही. आपल्याला वेगवेगळ्या लोकांशी व्यवहार करून आपलं हित कसं साधायचं हे शिकायला पाहिजे," असे ते म्हणाले.
हे वाचलंत का :
- परराष्ट्र मंत्री एस जयशंकर नागपूर दौऱ्यावर, रेशीमबागेत संघ कार्यालयात हजेरी
- रामायणात महान मुत्सद्दी आहेत, राजकारणाबाबत बरंच काही शिकायला मिळतं - एस जयशंकर