Rule Change From 1st September 2023 :नवी दिल्ली :सप्टेंबर महिन्याची सुरुवातही अनेक बदलांनं होणार आहे. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे. या बदलांचा स्वयंपाकघरापासून ते शेअर बाजार, गुंतवणुकीवर परिणाम होईल. त्याचबरोबर पगारदार वर्गातील लोकांनाही बदलांना सामोरं जावं लागणार आहे. त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. 1 सप्टेंबरपासून काय बदल होणार आहेत जाणून घेऊया.
LPG गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल :पहिल्या बदलामध्ये एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतींचा समावेश आहे. गॅस कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला दर ठरवतात. अशा परिस्थितीत एलपीजी गॅसच्या किमतीत तफावत बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारनं घरगुती गॅसच्या किमती 200 रुपयांनी कमी केल्या आहेत. आता गॅस कंपन्यांच्या भूमिकेची प्रतीक्षा आहे, कारण या बदलाचा थेट परिणाम देशातील जनतेवर होणार आहे. (Domestic gas rates reduced)
CNG-PNG गॅसच्या किमतींमध्ये बदल : दुसऱ्या बदलामध्ये CNG-PNG गॅसच्या किमतींचा समावेश आहे. महिन्याच्या पहिल्या दिवशी CNG-PNGच्याकिमती ठरवल्या जातात. 1 सप्टेंबर 2023 पासून त्यांच्या किमतीत बदल दिसून येणार आहे. त्याचा परिणाम स्वयंपाकघरापासून ते प्रवासापर्यंत सर्वच गोष्टींवर होणार आहे. (Changes in CNG rates)
IPO चे नवीन नियम लागू :तिसर्या बदलाबद्दल बोलायचं तर IPO बाबत SEBI च्या निर्णयाशी संबंधित आहे. सेबीनं आयपीओ बंद झाल्यानंतर कंपनीचे शेअर्स शेअर बाजारात सूचीबद्ध करण्याची अंतिम मुदत बदलली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सेबीनं ही मुदत तीन दिवसांपर्यंत कमी केली आहे. यासंबंधित अधिसूचना जारी करताना सेबीनं सांगितलं की, नवीन नियम 1 सप्टेंबर 2023 रोजी किंवा त्यानंतर येणाऱ्या सर्व IPO साठी लागू होईल. SEBI नं 28 जून रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला होता. (New rules of IPOs apply)
क्रेडिट कार्डच्या नियमातही बदल : चौथ्या बदलामध्ये क्रेडिट कार्डशी संबंधित नियमांचा समावेश आहे. खासगी क्षेत्रातील ॲक्सिस बँकेच्या मॅग्नम क्रेडिट कार्डच्या ग्राहकांसाठी 1 सप्टेंबर 2023 पासून बदल होणार आहेत. सप्टेंबरच्या पहिल्या दिवसापासून नवीन नियम लागू होतील. बँकेनं दिलेल्या माहितीनुसार, काही व्यवहारांवर विशेष सवलतीचा लाभ मिळणार नाही. त्याचवेळी, 1 सप्टेंबर 2023 पासून, कार्डधारकांना वार्षिक शुल्क देखील भरावं लागेल. (Changes in credit card rules)