नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी धर्मांतरावर भाष्य केले आहे. तरुण हिंदू मुली आणि मुलांचे धर्मांतर करणे चुकीचे आहे. त्यांनी स्वतःच्या धर्माचा आणि परंपरांचा अभिमान बाळगण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हटलं. भागवत यांनी रविवारी उत्तराखंडमधील हल्दवानी येथे एका कार्यक्रमात संघ कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबीयांना संबोधित केले. यावेळी ते बोलत होते.
"धर्मांतरण कसे होते? हिंदू मुली आणि मुले क्षुल्लक स्वार्थासाठी, लग्नासाठी इतर धर्म स्वीकारतात. हे चुकीचे आहे. तरुणांनी आपल्या धर्माबद्दल आणि परंपरेबद्दल आदर बाळगण्याची गरज आहे. आपण आपल्या मुलांना तयार केले पाहिजे आणि त्यासाठी आपण शिकले पाहिजे. आपण त्यांना मुल्ये देण्याची गरज आहे, असे भागवत म्हणाले.
पारंपारिक कौटुंबीक मूल्ये आणि परंपरा जपण्यावर भागवत यांनी भाष्य केले. तसेच त्यांनी लोकांना भारतीय पर्यटन स्थळांना भेट देण्याचे, घरगुती खाद्यपदार्थ खाण्याचे आणि पारंपारिक पोशाख घालण्याचे आवाहन केले. भागवत यांनी नमूद केले, की भारतीय संस्कृतीच्या मुळांशी जोडलेले राहण्यासाठी सहा 'मंत्र' आहेत. ज्यात भाषा, भोजन, भक्तीगीते, प्रवास, ड्रेस आणि घर यांचा समावेश आहे.
त्यांनी लोकांना पारंपारिक रीतिरिवाजांचे पालन करण्याचे आवाहन केले. तसेच अस्पृश्यता सारख्या नापाक रूढींचा त्याग केला पाहिजे, असे त्यांनी म्ह्टलं. जातीच्या आधारावर भेद करू नका. अस्पृश्यता नसावी. समाजाला नावांवरून धर्माचा अंदाज लावण्याची सवय आहे. लोकांचा भेद पूर्णपणे अंतःकरणातून काढून टाकला पाहिजे, असे ते म्हणाले. तसेच पर्यावरणीय समस्यांवर चर्चा करण्यास त्यांनी सांगितले. तर "जेव्हा हिंदू जागृत होतील, तेव्हा जग जागृत होईल," असे सरसंघचालक म्हणाले.