रुरकी ( उत्तराखंड ) : पिरान कालियार येथील हॉटेलमध्ये सुटकेसमध्ये भरलेला तरुणीचा मृतदेह गुरुवारी सापडला. तरुणीच्या प्रियकराने सुरुवातीस प्रेयसीच्या आत्महत्येचा बनाव रचला होता. मात्र पोलिसांच्या तपासात हा बनाव उघडकीस आला. घटनेचा खुलासा करताना देहातचे पोलीस अधीक्षक प्रमेंद्र डोवाल म्हणाले की, आरोपी प्रियकराने प्रेयसीची हत्या केली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी प्रियकर मृतदेहाला सुटकेसमध्ये भरून घेऊन निघाला होता. त्याने हॉटेलमध्ये रूम मिळवण्यासाठी मुलीच्या फेक आयडीचा वापर केला होता. हत्या करण्यात आलेली तरुणी ही मंगळूरची रहिवासी होती आणि आरोपी तरुणाची दूरची नातेवाईकही होती.
हॉटेल कर्मचाऱ्यांना आला संशय :गुरुवारी रात्री उशिरा घोसियन ज्वालापूर (हरिद्वार) येथील रहिवासी गुलजेबचा मुलगा सनवर याने रुरकी येथील पिरान कालियार येथे असलेल्या गेस्ट हाऊसमध्ये खोली घेतली. गेस्ट हाऊसमध्ये तो त्याची गर्लफ्रेंड रामशा हिच्यासोबत थांबला होता. काही तासांनंतर गुलजेब जड सुटकेस घेऊन हॉटेलबाहेर आला. त्यावेळी हॉटेल कर्मचाऱ्यांना त्याच्यावर संशय आला. हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने टाळाटाळ केली. त्याला पकडल्यानंतर सुटकेस उघडली असता त्यात मुलीचा मृतदेह आढळून आला. यावेळी उपस्थितांनी घटनेची माहिती पोलिसांना देत आरोपी तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेऊन मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.