लंडन - ऋषी सुनक (Rishi Sunak New UK PM ) हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान झाले आहेत. आज म्हणजेच दिवाळीच्या दिवशी याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान होणारे भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती आहेत. त्यामुळे आज ब्रिटनमध्ये मोठ्या जल्लोषात दिवाळी साजरी केली जात आहे. मागील अनेक दिवसांपासून ब्रिटनमध्ये राजकीय घडामोडी घडत होत्या. आज अखेर नव्या पंतप्रधानांची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांनी देखील ट्विट करत सुनक यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन - UK पंतप्रधानपदी विराजमान झाल्याबद्दल ऋषी सुनक यांचे अभिनंदन. मी जागतिक समस्यांवर एकत्र काम करण्यासाठी आणि रोडमॅप 2030 ची अंमलबजावणी करण्यास उत्सुक आहे, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
जॉन्सन यांची माघार -भारतीय वंशाचे ब्रिटनचे नेते ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे. ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी माघार घेतल्यामुळे सुनक यांचा विजय जवळजवळ निश्चित मानला जात होता. जॉन्सन यांनी माघार घेतल्यानंतर पेनी मॉर्डन्ट यांच्याकडे सुनक यांचे प्रतिस्पर्धी म्हणून पाहिले जात होते. मात्र, सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी सुनक यांना पाठिंबा दिल्यामुळे शेवटी ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. सुनक हे मागील सात महिन्यांतील ब्रिटनचे तिसरे पंतप्रधान आहेत.
ऋषी सुनक याआधीही होते PM उमेदवार -ऋषी सुनक दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होते. याआधी जुलै महिन्यात ते लिझ ट्रस यांचे प्रतिस्पर्धी म्हणून पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरले होते. मात्र, तेव्हा त्यांना पंतप्रधानपदाने हुलकावणी दिली होती. त्या निवडणुकीत लिझ ट्रस विजयी झाल्या होत्या. मात्र, पक्षाचा पाठिंबा गमावल्यामुळे ट्रस यांना अवघ्या ४५ दिवसांत राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता ऋषी सुनक हे दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरले होते.
कोण आहेत ऋषी सुनक - ऋषी सुनक यांचे आई-वडील मूळचे भारतीय आहेत. त्यांचा जन्म 12 मे 1980 रोजी साउथम्प्टन, इंग्लंड येथे झाला. सुनक यांचे भारतासोबत अतूट नाते राहिले आहे. ऋषी सुनक यांचे आजी-आजोबा भारतातून आफ्रिकेत स्थायिक झाले होते. त्यानंतर त्यांचे वडील आफ्रिकेतून ब्रिटनमध्ये स्थायिक झाले. ऋषी सुनक यांचे आजोबा पंजाबमधून टांझानियाला गेले. यानंतर त्यांच्या आईचे कुटुंब टांझानियाहून ब्रिटनमध्ये गेले. त्यांच्या आई-वडिलांनी ब्रिटनमध्येच लग्न केले. ऋषी सुनक हे 42 वर्षांचे असून त्यांनी प्रसिद्ध उद्योगपती नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्तीसोबत लग्न केले आहे. ऋषी सुनक हे पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत.
देशाची अर्थव्यवस्था सुरळीत करायची - उमेदवारी जाहीर करताना ऋषी सुनक म्हणाले होते की, त्यांना देशाची अर्थव्यवस्था सुरळीत करायची आहे, पक्षाला एकत्र करायचे आहे आणि देशासाठी काम करायचे आहे. यापूर्वी सोमवारी, माजी गृहमंत्री प्रिती पटेल, कॅबिनेट मंत्री जेम्स क्लेवर्ली आणि नदीम जाहवी यांच्यासह अनेक प्रमुख कंझर्व्हेटिव्ह खासदारांनी सुनकच्या समर्थनार्थ जॉन्सन यांच्या गटातून बाहेर पडले. प्रिती पटेल या भारतीय वंशाच्या माजी ब्रिटीश मंत्री आहेत. ज्यांनी मागील महिन्यात लिझ ट्रस पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.