हैदराबाद Revanth Reddy CM of Telangana : काँग्रेसचे अनुमुला रेवंत रेड्डी यांनी आज तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दुपारी 1.04 वाजता त्यांचा शपथविधी झाला. तेलंगणाचा राज्यपाल टी सुंदरराजन यानी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वड्रा यांच्यासह इतर प्रमुख काँग्रेसनेते या सोहळ्याला उपस्थित होते. काँग्रेस नेतृत्वानं मंगळवारी रेवंत रेड्डी यांना काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आणि तेलंगणाचे पुढील मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला.
इंडिया आघाडीच्या मुख्यमंत्री, नेत्यांना शपथविधीचं आमंत्रण : पक्षाच्या सूत्रांनुसार, रेवंत यांनी ममता बॅनर्जी आणि एम के स्टॅलिन यांच्यासह अनेक इंडिया आघाडीच्या नेत्यांना फोन करत त्यांच्या शपथविधीसाठी आमंत्रित केलं होतं. मात्र, ममतांनी इतर कार्यक्रमांमुळं या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास असमर्थता व्यक्त केली होती. त्यांनी तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतील नेते डेरेक ओब्रायन यांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी हैदराबादला जाण्यासाठी सांगितलंय. तामिळनाडूतील पुरामुळं मुख्यमंत्री स्टॅलिन यांची उपस्थितीही नव्हती. रेवंत यांनी सीपीआय (एम) चे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनाही फोन केला होता.
कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत दिल्लीत भेटीगाठी : रेवंत रेड्डी हे बुधवारी हैदराबादला परतले. मात्र, त्यांच्यासोबत कोण शपथ घेणार याबाबत त्यांनी मौन बाळगलं होतं. मात्र आज पक्षाच्या ११ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ रेड्डी यांच्यासोबत घेतली. बुधवारी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यांनी राहुल, सोनिया आणि काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांचीही भेट घेतली. राहुल यांनी X (पुर्वीचं ट्विटर) वर पोस्ट केलंय की, तेलंगणाचे नामनिर्देशित मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचं अभिनंदन! त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकार तेलंगणातील जनतेला दिलेल्या सर्व हमींची पूर्तता करेल आणि लोकाभिमुख सरकार स्थापन करेल.
सहा हमींवर आम्ही ठाम : काँग्रेस पक्ष आणि त्यांचे सर्व नेते एकत्रितपणे तेलंगणाच्या प्रजेसाठी काम करतील. तेलंगणासाठी सहा हमींची आमची प्रतिज्ञा ठाम आहे, असं कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलंय. त्यांच्या मंत्रिमंडळाच्या रुपरेषेवर चर्चा करण्यासाठी त्यांनी पक्षाचे तेलंगणा प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्याशी येथील महाराष्ट्र सदनात बैठक घेतली. काँग्रेस विधिमंडळ पक्षानं त्यांना राज्यातील सर्वोच्च पदासाठी नेता निवडण्याचं काम सोपवल्यानंतर खरगे यांनी मंगळवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून रेवंत यांची निवड केली होती.
हेही वाचा :
- रेवंत रेड्डी तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री, 'या' तारखेला होणार शपथविधी
- "तेलंगणात 'या' नेत्याला मुख्यमंत्री करा", राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं; लवकरच होणार शपथविधी
- ABVP सदस्य ते तेलंगणात कॉंग्रेसच्या मुख्यमंत्री पदाचे दावेदार! असा आहे रेवंत रेड्डी यांचा प्रवास