नवी दिल्ली Telangana Chief Minister :तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रेवंत रेड्डी यांना पक्षाच्या विधिमंडळ दलाचा नेता घोषित करण्यात आलं आहे. अशा प्रकारे आता रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री बनतील. रेड्डी यांचा शपथविधी सोहळा ७ डिसेंबरला होणार आहे. काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी पक्षाच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत रेवंत रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली.
विधिमंडळ दलाच्या बैठकीत निर्णय : वेणुगोपाल म्हणाले की, "काँग्रेस विधिमंडळ दलाची काल हैदराबादमध्ये विधिमंडळ दलाचा नेता ठरवण्यासाठी बैठक झाली. त्या बैठकीत राज्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना अहवाल सादर केला. या अहवालाचा विचार केल्यानंतर आणि वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर काँग्रेस अध्यक्षांनी रेवंत रेड्डी हे विधिमंडळ दलाचे नेते असतील, असा निर्णय घेतला".
७ डिसेंबरला शपथविधी : "रेवंत रेड्डी हे सध्या तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. ते बहुआयामी नेते असून त्यांनी निवडणुकीत ज्येष्ठ नेत्यांसह पूर्ण ताकदीनं प्रचार केला होता", असंं वेणुगोपाल यांनी नमूद केलं. उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाशी संबंधित प्रश्नावर वेणुगोपाल म्हणाले की, अधिक तपशील नंतर कळवला जाईल. "हा वन मॅन शो नसून ही एक टीम असेल. काँग्रेस एका टीमसह पुढे जाईल". वेणुगोपाल यांनी ७ डिसेंबरला शपथविधी होणार असल्याचं सांगितलं.
राहुल गांधी यांचा पाठिंबा : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात मंगळवारी दुपारी बैठक झाली. या बैठकीत रेवंत रेड्डी यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. रेड्डी यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी जवळपास निश्चित मानलं जात होतं. राहुल गांधी यांचाही त्यांच्या नावाला पाठिंबा होता. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विजयाचं श्रेय रेवंत रेड्डी यांना दिलं जात आहे.
हेही वाचा :
- ABVP सदस्य ते तेलंगणात कॉंग्रेसच्या मुख्यमंत्री पदाचे दावेदार! असा आहे रेवंत रेड्डी यांचा प्रवास
- "तेलंगणात 'या' नेत्याला मुख्यमंत्री करा", राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं; लवकरच होणार शपथविधी