उत्तरकाशी (उत्तराखंड) Uttarkashi Tunnel Rescue Operation : उत्तराखंडमधील उत्तरकाशी सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांची सुखरूप सुटका व्हावी यासाठी गेल्या 15 दिवसांपासून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. मात्र, या बचावकार्यात अनेक प्रकारचे अडथळे येत आहेत. अवजड मशीन्समुळं अडचणी येत आहेत. परंतु बचाव पथकानं आपलं कार्य हिरीरीनं सुरू ठेवलंय.
व्हर्टिकल ड्रिलिंगचं काम सुरू :दिवाळीच्या पहिल्या दिवशी माती कोसळून 41 मजूर बोगद्यामध्ये अडकले. 12 नोव्हेंबरपासून हे बचावकार्य सुरु आहे. मात्र, अजूनही मजुरांना बाहेर काढण्यात यश आलेलं नाही. आज या बचावकार्याचा 16 वा दिवस आहे. अर्धा महिना उलटून गेल्यानंतरही सर्व बचाव पथकं कामगारांपर्यंत पोहोचू शकलेली नाही. रविवारी (26 नोव्हेंबर) मशिन बिघडल्यानं उत्तरकाशी सिलक्यारा बोगदा बचावकार्य विस्कळीत झालं होतं. मात्र आता बचावकार्यासाठी व्हर्टिकल ड्रिलिंगचं काम सुरू झालं असून बोगद्याच्या ढिगाऱ्यात अडकलेले ऑगर मशीन कापण्याचं कामही सुरू आहे. तसंच यानंतर बोगद्यात मॅन्युअल काम केलं जाणार आहे.
20 मीटर खोदकाम पुर्ण :रविवारी हैदराबादहून प्लाज्मा कटर उत्तर काशीला पोहोचलं, आणि चंदीगडहून लेझर कटरही आणण्यात आलं. ढिगाऱ्याखाली अडकलेले ऑगर मशीनचे पार्ट काढण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणी अधिक माहिती देत उत्तराखंड सरकारचे सचिव डॉ. नीरज खैरवाल म्हणाले की, लेझर कटर आणि प्लाज्मा कटरच्या सहाय्यानं पाईपमध्ये अडकलेल्या ऑगर मशीनचं ब्लेड कापण्याचं काम सुरू आहे. बोगद्याच्या वरच्या डोंगराळ भागावरही उभ्या पद्धतीनं खोदण्याचं काम सुरू आहे. आतापर्यंत 20 मीटर खोदकाम करण्यात आलं असून अंदाजे 88 मीटर ड्रिलिंग करायचे अद्याप बाकी आहे. बरकोटच्या बाजूनंही बोगद्यात 4 स्फोट घडवून 10 मीटरचं काम पूर्ण झालंय.
मुख्यमंत्र्यांनी घेतली मजुरांच्या कुटुंबीयांची भेट :दरम्यान, सिलक्यारा येथे निर्माणाधीन बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी विविध यंत्रणा बचाव कार्यात गुंतल्या आहेत. रविवारी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी टनकपूर येथील मजुर पुष्कर सिंग ऐरी याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी कामगाराचे कुटुंबीय भावूक झाले. यावेळी बोलत असताना बचावकार्य लवकरच पूर्ण करून सर्व मजूर लवकरच बाहेर येतील असं मुख्यमंत्री म्हणाले.
हेही वाचा -
- उत्तराखंडमधील प्रस्तावित ६६ बोगद्यांच्या बांधकामाचं काय होणार? उत्तरकाशी दुर्घटनेनंतर शास्त्रज्ञांचा सरकारला 'हा' सल्ला
- उत्तराखंड सिलक्यारा बोगदा बचावकार्याचा 15वा दिवस; अमेरिकन ऑगर मशीनमध्ये पुन्हा बिघाड झाल्यानं हातानं खोदकाम सुरू होण्याची शक्यता
- बोगद्यात अडकलेल्या मजुरांची आज सुटका होणार? अमेरिकेतील मशीन असूनही बचावकार्यात 'हा' आहे मोठा अडथळा