गंगटोकRescue of tourists stuck in Sikkim :पूर्व सिक्कीममध्ये, हिमवर्षाव, खराब हवामानामुळं अडकलेल्या 1 हजार 217 पर्यटकांची भारतीय जवानांनी सुटका केलीय. सैन्याच्या त्रिशक्ती कॉर्प्सनं राबवलेलं बचावकार्य बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होतं. पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं असून त्यांना निवारा, उबदार कपडे, वैद्यकीय मदत, अन्न पुरवण्यात आलंय.
पर्यटकांची वाहनं अडकली :भारतीय सैन्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर सिक्कीम, लाचेन, लाचुंग, चुंगथांग, सांजा, पेलिंग, चांगूत अशा अनेक ठिकाणी हिमवृष्टी झाली आहे. पर्यटक लाचुंग, लाचेनसह उत्तर सिक्कीमच्या उंच शिखरांना पर्यटनाचा आनंद घेत होते. त्यावेळी अचानक हवामान खराब झालं. त्यानंतर जोरदार हिमवृष्टी झाली. अनेक ठिकाणी गाराही पडल्या. त्यामुळं किमान चारशे पर्यटकांची वाहनं रस्त्यातच अडकून पडली. त्यानंतर उत्तर सिक्कीम प्रशासनाकडून ही बातमी भारतीय सैन्यापर्यंत पोहोचली. माहिती मिळताच भारतीय सैन्याच्या त्रिशक्ती कॉर्प्सचे जवानं तिथ दाखल होत, त्यांनी अडकलेल्या पर्यटकांची सुटका केली. सुटका करण्यात आलेल्या लोकांमध्ये 256 महिला, 67 मुले आहेत. सर्वांना सैन्याच्या बॅरेकमध्ये नेण्यात आलंय. पर्यटकांसाठी विशेष वैद्यकीय पथकाचीही व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी सैन्यानं पर्यटकांना उबदार कपडे, अन्न, प्राथमिक उपचार दिले आहेत. याबाबत कर्नल अंजन कुमार बसुमातारी यांनी सांगितलं की, 'सीमेचं रक्षण करण्यासोबतच हिमालयाच्या उंचीवर असलेल्या स्थानिक रहिवाशांना, पर्यटकांना वाचवण्यासाठी आम्ही नेहमीच सक्रिय असतो.'