प्रयागराज :उमेश पाल हत्याकांडातील आरोपी अतिक अहमदचा मुलगा असद आणि शूटर गुलाम यांना गुरुवारी एसटीएफने चकमकीत ठार केले. एकीकडे असद याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू असताना दुसरीकडे गुलाम याच्या नातेवाईकांनी मात्र त्याचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. गुलामचे नातेवाईक म्हणतात की, आम्ही गुलाम याला नेहमी योग्य मार्गावर चालण्यास सांगितले, परंतु त्याने चुकीचा मार्ग निवडला. त्यानंतर आम्ही त्याच्याशी संबंध तोडले होते.
नातेवाईकांचा अंतिम संस्कार करण्यासही नकार : झाशीमध्ये असद आणि गुलाम यांच्या चकमकीनंतर पोलिसांनी त्यांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन केले. आज या दोघांचे मृतदेह प्रयागराज येथे आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, गुलाम याच्या नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. गुलामची आई साबिया सांगते की, आम्ही गुलामला योग्य मार्गावर चालायला सांगितले होते, पण त्याने आमचे ऐकले नाही. तो चुकीच्या मार्गावर गेला. आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. पण मी खूप दुःखी आहे. साबिया म्हणते की, जेव्हा गुलाममुळे आमचे घर पाडले जात होते, तेव्हाच आम्ही त्याला सांगितले होते की, जर त्याचा एन्काउंटर झाला तर आम्ही मृतदेह स्वीकारणार नाही. तसेच आम्ही त्याचे अंतिम संस्कारही करणार नाही.