नवी दिल्ली : रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन केल्याने देशभरात उत्साह होता. मात्र दुसरीकडे कुस्ती परिषदेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात जंतरमंतर मैदानावर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलन केल्याप्रकरणी बजरंग पुनिया, विनेश फोगाट, साक्षी मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण : कुस्ती परिषदेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांनी कुस्तीपटू मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोपकाही कुस्तीपटूंनी केला आहे. त्यावरुन ब्रिजभूषण सिंह यांना बडतर्फ करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी कुस्तीपटूंनी केली होती. त्यासाठी कुस्तीपटूंनी दिल्लीतील जंतरमंतर मेदानावर आंदोलन सुरू केले होते. मात्र कुस्तीपटूंच्या या आंदोलनाची दखल घेण्यात आली नव्हती. त्यामुळे कुस्तीपटूंनी जंतरमंतर मैदानातच दिवसरात्र आंदोलन सुरू केले होते.
चौकशीसाठी समितीची नेमणूक :ब्रिजभूषण सिंह यांच्यावर करण्यात आलेल्या या आरोपाची चौकशी करण्यासाठी सरकराने एक चौकशी समिती नेमून पीटी उषा यांच्याकडे त्या समितीचे अध्यक्षपद दिले होते. मात्र कुस्तीपटूंनी या समितीला विरोध केला होता. कुस्तीपटूंनी पीटी उषा यांच्यावरही आरोप केले होते. त्यानंतर हे प्रकरण आणखी चिघळले होते.
कुस्तीपटूंवर गुन्हा दाखल : दिल्लीतील जंतरमंतर मैदानात सुरू असलेल्या आंदोलनात कुस्तीपटूंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. रविवारी दिल्लीत नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यात येणार होते. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी सुरक्षेमुळे कुस्तीपटूंना आंदोलन मागे घेण्यासाठी प्रयत्न केले. मात्र यावेळी झालेल्या वादातून पोलिसांनी कुस्तीपटूंवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कुस्तीपटूंना ताब्यात घेऊन जंतरमंतरवरील सगळे तंगबू उखडून टाकले आहे.
न्याय मिळत नाही, तोपर्यंत घरी जाणार नाही :दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंवर गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेतले आहे. मात्र आमच्या बहिणींना न्याय मिळत नाही, तोवर घरी जाणार नसल्याची भूमिका कुस्तीपटूंनी घेतली आहे. कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरीह आक्रमक पवित्रा घेतल्याने वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आमच्या बहिणींना न्याय मिळत नाही, तोपर्यंत घरी जाण्यात काही अर्थ नसल्याची प्रतिक्रिया कुस्तीपटू बजरंग पुनिया याने दिली आहे.
हेही वाचा -
- Wrestler Protest In Delhi : कुस्तीपटूंना न्याय मिळेल का, दिग्गज खेळाडूंचा सवाल, प्रियंका गांधीही आंदोलकांना भेटल्या
- CM Kejriwal Meet Wrestlers: केजरीवाल कुस्तीपटूंना भेटले! म्हणाले, भाजप बलात्काऱ्यांना का वाचवतय?
- Wrestlers Protest : ब्रिजभूषण सिंह दिल्ली पोलिसांच्या एसआयटीसमोर हजर, स्वत:वरील सर्व आरोपांचे केले खंडण