नवी दिल्ली -सप्टेंबर महिन्यात झालेल्या मान्सूनच्या पावसाने गेल्या 19 वर्षांचे रेकॉर्ड मोडले आहेत. भारतीय हवामान खात्याच्या मते, दिल्लीच्या लोधी रोडमध्ये गेल्या 30 तासांत 196 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सफदरजंग वेधशाळेत 188.6 मिमी, रिज 133.6 मिमी, आया नगर 114.6 मिमी, पालम 192.1 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे दिल्लीतील वेगवेगळ्या भागात पाणी साचलं असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
गेल्या 27 तासांत राजधानी दिल्लीत 190 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. 2 दिवसांच्या मुसळधार पावसानंतर, हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येत्या 24 तासात दिल्लीत मुसळधार पाऊस पडू शकतो. या व्यतिरिक्त, हवामान विभागाच्या मते, गेल्या 24 तासांदरम्यान झालेल्या पावसाने आतापर्यंत झालेल्या मुसळधार पावसाचा पाचव्यांदा विक्रम मोडला आहे.
हवामान खात्याच्या मते, सप्टेंबरच्या पहिल्या दिवशी झालेल्या पावसाने गेल्या 19 वर्षांचे रेकॉर्ड मोडले आहे. मुसळधार पावसाचा हवामान विभागाने आधीच अलर्ट जारी केला होता. आता पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. बुधवारी किमान तापमान 24 अंश आणि कमाल तापमान 29 अंश नोंदवले गेले आहे. हवामान खात्याच्या मते 2 सप्टेंबरला म्हणजेच गुरुवारी पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. आज दिल्लीत कमाल तापमान 31 अंश आणि किमान तापमान 25 अंश राहण्याचा अंदाज आहे.