हैदराबाद : टीआरएस आमदार के कविता (TRS MLC Kavitha) यांनी गुरुवारी सांगितले की, त्या आणि त्यांच्या पक्षाचे नेते जे सध्या ईडी आणि सीबीआयसारख्या केंद्रीय एजन्सीच्या रडारखाली आहेत, ते कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहेत. ईडीने दिल्ली दारू घोटाळ्यातील आरोपींपैकी अमित अरोरा याच्या रिमांड अहवालात नावाचा उल्लेख केला होता. (TRS MLC Kavitha on Delhi liquor scam case).
आम्हाला फाशी देणार का? : कविता म्हणाल्या, "आम्ही कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरे जाऊ. एजन्सी आल्या आणि आम्हाला प्रश्न विचारले तर आम्ही नक्कीच उत्तर देऊ. पण माध्यमांना निवडक लीक्स देऊन नेत्यांची प्रतिमा मलिन केली तर लोकं याचा विरोध करतील. भाजपने लोकशाही पद्धतीने निवडून आलेली आठ राज्यातील सरकारे पाडली आणि मागच्या दरवाजाच्या राजकारणातून सत्ता हिसकावून घेतली. मी मोदींना विनंती करते की त्यांनी ही वृत्ती बदलली पाहिजे. ईडी आणि सीबीआयचा वापर करून निवडणुका जिंकणे शक्य नाही. तेलंगणातील लोकं हुशार आहेत. आम्हाला तुरुंगात टाकलं तर जास्तीत जास्त काय होईल? आम्हाला फाशी देणार का? यात घाबरण्यासारखे काही नाही."